मुंबई : मलबार हिलवरील सर्वांत प्रशस्त आणि सी-फेसिंग व् ू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला होय. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनातर्फे रामटेक बंगला देण्यात आला. मात्र या रामटेक बंगल्याची बावनकुळेंकडून अदलाबदल करण्याची चर्चा सुरू आहे.
हा बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात येणार असून बावनकुळे या बंगल्याची अदलाबदल करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे रामटेक बंगला घेण्याची मुंडेंचीही तयारी असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी या बंगल्यासंदर्भात होकार दर्शवला असल्याची चर्चा आहे.
‘रामटेक’ बंगल्याचा नेमका इतिहास काय?
दुसरीकडे याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकं मुरडताना दिसतायत. अशातच राजकीय वर्तुळात शुभ-अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाला आहे.
दरम्यान, माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसला, त्यामुळे अनेक उलटसुलट अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच, पंकजा मुंडे हा बंगला स्वीकारतात का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.