ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ महम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे खातेवाटप शुक्रवारी पार पडले. युनूस यांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहारासह महत्त्वाची २७ खाती स्वत:कडे ठेवून घेतली आहेत. याचाच अर्थ या हंगामी सरकारची संपूर्ण जबाबदारी युनूस यांच्याकडे असेल! आरक्षणाच्या मुद्यावरून बांगलादेशात पेटलेले आंदोलन व सुरू झालेला हिंसाचार यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले! या आंदोलनाचा एक प्रमुख हेतू त्याद्वारे सफल झाला असेच म्हणावे लागेल. मात्र, त्यानिमित्ताने देशात जी आग पेटली ती आणखी काय-काय भस्मसात करणार? असा प्रश्न बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीने निर्माण झाला आहे.
शेख हसीना यांनी देश सोडला व आंदोलकांच्या मागणीप्रमाणे महम्मद युनूस यांनी हंगामी सरकारचे प्रमुखपद स्वीकारले तरी देशातील हिंसाचार थांबलेला नाही. उलट आंदोलनाच्या आडून बांगलादेशातील हिंदूंवर, अवामी लीगच्या नेते, कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. विशेष म्हणजे देशातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारल्याची घोषणा करणा-या लष्कराकडून हिंसाचार थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे हजारो हिंदू सीमेवर येऊन भारतात आश्रयाची मागणी करत आहेत. भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत व बांगलादेशी निर्वासितांना आश्रय देण्या न देण्याबाबत अद्याप कुठला निर्णय घेतलेला नाही. थोडक्यात शेख हसीना यांच्या जागी महम्मद युनूस आल्याने बांगलादेशात नेतृत्वाचा चेहरा बदलला असला तरी तेथील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही आणि हेच महम्मद युनूस यांच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे.
युनूस यांनी हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर देशासाठी हा दुसरा मुक्तीदिन असल्याचे वक्तव्य केले. ते सत्ताबदलाची अपेक्षा असणा-या आंदोलकांना खुश करणारे असले तरी ही खुशी तात्पुरती ठरणार आहे. कारण आंदोलकांची मूळ अपेक्षा त्यांचा भ्रमनिरास करणारी परिस्थिती बदलावी ही आहे. ती इच्छा तातडीने पूर्णत्वास जावी, हीच आंदोलकांची अपेक्षा असणार. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास आंदोलकांना अपेक्षाभंगाचे जे दु:ख सोसावे लागेल त्याबाबतचा त्यांचा संताप व उद्रेक सध्याच्या कैकपटींनी जास्त असेल! असे घडल्यास बांगलादेशचा दुसरा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. हे घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची जबाबदारी महम्मद युनूस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. महम्मद युनूस यांचा अर्थतज्ज्ञ म्हणून असणारा लौकिक व त्यांनी देशातील अनेक कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेले कार्य वादातीतच! मात्र, देशाचा गाडा हाकण्यासाठी ज्या राजकीय कौशल्याची गरज आहे ते कौशल्य युनूस यांच्याकडे आहे काय? हा सर्वांत कळीचा प्रश्न आहे. हे राजकीय कौशल्य सिद्ध करण्याची चाचणी म्हणजे निवडणुका! युनूस यांनी दशकभरापूर्वी राजकीय क्षेत्रात येण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी अद्याप ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात कधीही उतरलेले नाहीत.
त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष राजकारणाचा तसा फारसा अनुभव नाही. सध्याच्या स्थितीत देशातील विरोधी पक्षांना जशी सत्तासंधी खुणावते आहे तशीच ती लष्करालाही खुणावते आहे. युनूस याच लष्कराच्या पाठिंब्यामुळे सरकारचे प्रमुख झाले आहेत. साहजिकच त्यांनी आपल्या मर्जीनुसार कारभार हाकावा, हीच लष्कराची इच्छा असणार! तर विरोधकांना आपल्याला सत्तेत योग्य वाटा मिळावा अशी अपेक्षा असणार! या अपेक्षांच्या दबावाखाली कारभार करताना देशातील जनतेच्या विशेषत: तरुणांच्या प्रचंड वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे शिवधनुष्य युनूस यांना पेलावे लागणार आहे. हे पेलण्यासाठी केवळ अर्थतज्ज्ञ असून चालत नाही कारण कुठलेही प्रयत्न केले तरी त्याला फळ येण्यास बराच काळ लागत असतो.
एका रात्रीतून जादूची कांडी फिरवून परिस्थिती बदलता येत नाही, हे वास्तव! मात्र, हे वास्तव जनतेच्या गळी व्यवस्थित उतरवण्यासाठी नेतृत्वाच्या अंगी राजकीय कौशल्य असावे लागते. त्याचा अभाव असल्यास जनतेचा अपेक्षाभंग होतो व तो जास्त उद्रेकी असतो. हे लक्षात घेता युनूस यांची वाट किती बिकट आहे, याची कल्पना यावी! रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या तातडीच्या प्रयत्नांसोबत देशातील हिंसाचार रोखून औद्योगिक-आर्थिक विकासासाठीचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करतानाच चीन व पाकिस्तानच्या देशातील हस्तक्षेपाच्या व आपला प्रभाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अटकाव करण्याच्या आघाडीवरही युनूस यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. बांगलादेशातील ताज्या उठावाला पाकिस्तान व इतर मुस्लिम राष्ट्रांचे बळ मिळाल्याची शंका वर्तवली जाते आहे.
ती किती खरी वा खोटी हे पुरावे मिळाल्यावरच सिद्ध होऊ शकते. मात्र, अस्थिर बांगलादेशात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी या शक्तींसह चीन टपून बसलेला आहे, हे उघड आहे. निर्मितीपासून आजवर भारताच्याच मदतीवर वाटचाल करणारा बांगलादेश कट्टरतावादी शक्तींच्या हाती जाणे भारताला शेजारी म्हणून परवडणारे नाही. त्यामुळे भारताला युनूस यांच्यासोबत विश्वासाचे व दृढ मैत्रीचे नाते निर्माण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे लागतील! युनूस बांगलादेशाला शांततेच्या व प्रगतीच्या वाटेवर कसे घेऊन जातील यासाठी युनूस यांना भारताला सर्वतोपरी मदत करावी लागेल! जिथे युनूस यांचे राजकीय कौशल्य कमी पडतेय हे दिसेल तिथे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून त्यांना मदत करावी लागेल कारण हाच भारताच्या व दक्षिण आशियाच्या हिताचा मार्ग आहे, हे मात्र निश्चित!