ओबीसी नेता म्हणून पुन्हा संधी
मुंबई : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून बॅक फूटवर आले होते. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी वारंवार आपली नाराजी व्यक्त केल्याचे बघायला मिळाले होते. परंतु आता भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन होताना दिसत आहे. राज्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती या परिपत्रकात जारी करण्यात आली. मुंबईत राजभवन येथे हा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे मोजक्याच जणांना निमंत्रण असणार असल्याचीदेखील माहिती समोर येत आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीनंतर भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले होते. त्यावर स्वत: भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत मनोमिलन झाल्याची माहिती समोर आली. अखेर अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ सकाळी १० वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली होती. त्याच जागी भुजबळ यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.