अमरावती : प्रतिनिधी
जन्मदात्या आईवरच मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना दर्यापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ५५ वर्षीय महिलेला अर्धांगवायू असल्याने ती महिला स्पष्टपणे बोलू शकत नाही. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी आरोपी मुलगा हा महिलेसोबत अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात पीडित महिलेचा पती घरी आला असता त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. महिलेच्या गालावर मारल्याचे देखील यावेळी पतीला दिसून आले.
पीडित महिलेने हातवारे करून आरोपी मुलाने यापूर्वी देखील बळजबरीने अत्याचार करून मारहाण केल्याचे पतीला सांगितले. या घटनेपूर्वी सुद्धा पीडित महिलेने हातवारे करून सदर घटनेबाबत सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरोपी हा मुलगा असल्याने समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी तक्रार देण्यात आली नव्हती.
दरम्यान १८ सप्टेंबर रोजी या घटनेची तक्रार पीडित महिलेच्या पतीने दर्यापूर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.