पिंपरी : प्रतिनिधी
पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटचा कर वाल्मिक कराडने थकवल्याची माहिती समोर आली होती. या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली होती. मात्र, गुरुवारी (दि.१६) १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा थकलेला कर भरण्यात आला. दुस-या फ्लॅटचाही चालू वर्षाचा कर भरण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने कारवाई थांबवल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.
वाकड येथील पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील ४०३ नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. १ एप्रिल २०१६ पासून हा फ्लॅट मंजली यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत पार्क स्ट्रीट सोसायटीत जून २०२१ मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला.
वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता. महापालिकेने नोटीस दिल्यानंतर कराचा भरणा केला आहे.
वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. जो आता भरण्यात आला आहे. एप्रिल २०१६ मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. मंजली कराडांच्या नावे असणा-या फ्लॅटचा कर मात्र नियमित भरला जायचा. परंतु, २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हफ्ता भरण्यात आला आहे. तर चालू वर्षाचा कर थकीत होता. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.