तिघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत, शेकडो लोकांचे स्थलांतर
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून, पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण स्थिती निर्माण झाली. पुरामुळे २ चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कर आणि प्रशासकीय पथकांनी बचाव कार्य सुरू केले असून १०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे वाहतुकीलाही मोठा फटका बसला. रामबनचे एसएसपी कुलबीर सिंह यांनी महामार्ग पाच ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. हवामानाची स्थिती पूर्वपदावर येताच वाहतूक सुरळीत होणार आहे, असे म्हटले. राज्यातील रामबनमधील सारी बागना गावात ढगफुटीची दुर्घटना घडली. यामध्ये आकिब अहमद आणि मोहम्मद साकिब या दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा मृत्यू झाला. यासोबतच धरम कुंडमध्येही पुरस्थिती ओढवली, ज्यामध्ये ४० घरांचे नुकसान झाले. यातील १० घरे पूर्णपणे उद््ध्वस्त झाली आहेत तर उर्वरित घराचे अंशत: नुकसान झाले आहे.
रामबन जिल्ह्यात ढगफुटीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दोन हॉटेल्स, काही दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. श्रीनगरला विमान वाहतूकही विस्कळीत झाली. ढगफुटीमुळे अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेकडो वाहनेही राडा-रोड्यात बुडाली.
मुख्यमंत्र्यांना दु:ख
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाकडून रामबनमधील या प्रलयाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. त्यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत आणि दुरुस्ती योजनांचा आढावा घेतला जाईल.
बाधित कुटुंबांना मदत
या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि इतर बचाव पथके वेगाने मदतकार्य करण्यासाठी गुंतली आहेत. सर्व बाधित कुटुंबांना शक्य तितकी मदत केली जात आहे, असेही सिन्हांनी नमूद केले.