20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रजय शहाने सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं आहे का?

जय शहाने सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं आहे का?

- उद्धव ठाकरेंचा अमित शहा यांना घराणेशाहीवरून सवाल

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि टप्पे कधीही जाहीर होऊ शकतात. अशात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यामध्ये अमित शहा असे म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्या विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला आहे. जय शहा याने सचिन आणि विराटला क्रिकेट शिकवलं आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

‘‘इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे.

‘अमित शहा तोंड वर करून बोललात, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. बरं करायचं आहे मला मुख्यमंत्री. पण यांनी मतं दिली तर तो होईल ना. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही. अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय? सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीला त्याने शिकवलंय का? त्याचा काय संबंध आहे क्रिकेटशी? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

गद्दारांची पोरंटोरं यांना चालतात
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘शिवसेनेतून जे गद्दार तिकडे घेतले त्यांची पोरंटोरं आणि त्यांची मस्ती यांना चालते. त्यांची घराणेशाही चालते. बाप मुख्यमंत्री आणि त्याचं कार्टं दुसरं काहीतरी ते चालतं. मोदींना अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलांची घराणेशाही असं तुम्ही म्हणता आणि त्याला गद्दारी करून खुर्चीवरून खाली खेचता, हा माझा दोष आहे का?’’ असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उरणच्या सभेत विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR