29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमनोरंजनजरांगेंची निवडणुकीतून माघार!

जरांगेंची निवडणुकीतून माघार!

जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आपण माघार का घेत आहोत हे सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केले आहे. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीमधून माघार घेण्याचा आजचा (४ नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे.

एकीकडे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे सर्वच पक्ष कसून या निवडणुकीच्या प्रचारासाठी तयारी करत आहेत. असे असतानाच मनोज जरांगे यांनी कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी दिली जाणार आहे, हे जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून सपशेल माघार घेतली आहे.

आपण निवडणुकीतून का माघार घेत आहोत हे सांगताना, एका जातीवर लढणे आणि जिंकणे शक्य नाही, असे जरांगेंनी समर्थकांना सांगितले आहे. तसेच पुढे बोलताना जरांगेंनी, मराठा बांधवांनी त्यांचे सर्व अर्ज मागे घ्यावेत, एकही अर्ज ठेवू नका, असे जरांगेंनी म्हटले आहे. आपल्याला आता निवडणूक लढायची नाही, असे जरांगेंनी जाहीर केले आहे. मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत, असे जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मतदारसंघ ठरलेले…
दरम्यान, जरांगेंनी मतदारसंघ ठरले होते मात्र उमेदवार ठरले नव्हते असे म्हटले आहे. मतदारसंघ ठरले होते. फक्त नावे ठरायची होती. ही माघार नाही, गनिमी कावा आहे, असे जरांगे म्हणाले. तसेच समाजाची आठवण येत असताना रविवारी बोलताना डोळ्यांत पाणी येत होते, असेही जरांगेंनी सांगितले.

पाडापाडीची भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण
याला पाडा आणि त्याला पाडा ही आपली भूमिका नाही, असेही जरांगेंनी यावेळेस स्पष्ट केले आहे. कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा, असे जरांगेंनी म्हटले आहे. मी कुणाला पाडा, कुणाला निवडून आणा असे काहीही सांगत नाही, असे जरांगेंनी म्हटले आहे.

जरांगेंचा संघर्ष समाजासाठी : खा. राऊत
जरांगेंचा संघर्ष समाजासाठी आहे. समाज त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने महाराष्ट्रात जो संघर्ष सुरू आहे, तो त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली, हे मान्य केले पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंधपणे उभा आहे. निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा जो लढा आहे तो राजकीय नव्हे, सामाजिक आहे असे आम्ही मानतो. ती एक सामाजिक चळवळ आहे. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल, असे राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR