24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगे पाटील- हाके यांच्यात खडाजंगी

जरांगे पाटील- हाके यांच्यात खडाजंगी

सरकार पुरस्कृत आंदोलनाच्या टीकेवर हाके संतापले

जालना : प्रतिनिधी
राज्यामध्ये मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याआधी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणं केली आहेत. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला सरकार पुरस्कृत उपोषण असल्याची टीका केली. यावरून हाके आक्रमक झाले असून त्यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आता खडाजंगी होताना दिसत आहे.
दरम्यान, जरांगे पाटील हे मराठा आरक्षण ओबीसीमधूनच पाहिजे असल्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर हाके ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडले नाही. तर ओबीसी समाजाचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत आहे. काही गोष्टी घडू लागल्या की लक्षात येते. अगोदरच्या आणि आताच्या आंदोलनात मोठा फरक आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलकांना भेटायला येणे हे सर्व नियोजित आहे. हे ठरवून सुरू आहे. ही राजकीय नेत्यांची चळवळ आहे हे लक्षात येते. सरकार ठरवून डाव टाकत आहे. पण त्यांनी कितीही डाव टाकले तरी एक दिवस हे त्यांच्याच अंगलट येणार आहे. काहीही घडले तरी मराठा समाज मागे हटणार नाही. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

लक्ष्मण हाके यांचे प्रत्युत्तर
ओबीसी उपोषणाला सरकार पुरस्कृत म्हटल्यामुळे हाके आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांच्या टीमने माझ्यासमोर चर्चा करायला यावे. मी मीडियासमोर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी कायद्याने उत्तरे द्यावी, असे आव्हान देखील लक्ष्मण हाके यांनी दिले आहे

 

दोन जातींमध्ये वाद लावण्याचे काम
या सर्व प्रकारामध्ये नवनाथ वाघमारे यांच्या पत्नी म्हणाल्या, नवनाथ वाघमारे यांच्या पोटात अन्न नाही. त्यांचं गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. सरकारने योग्य निर्णय घ्यावा. ओबीसींवर अन्याय करू नये. त्यांच्या जीवाला धोका असला तरी हे आंदोलन थांबणे शक्य नाही. ते म्हणत आहेत, तू आपला परिवार संभाळ. माझ्यासाठी आता समाज परिवार आहे. मराठा नेते मजोज जरांगे यांनी दोन जातींमध्ये जो वाद निर्माण केला आहे तो बंद करावा, ही त्यांना विनंती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होत आहे, असे नवनाथ वाघमारे यांच्या पत्नी म्हणाल्यौ

आता शैक्षणिक आरक्षणावर घाला
नवनाथ वाघमारे यांच्या मुलीनेदेखील प्रतिक्रिया दिली, माझे वडील समाजासाठी एवढे करत आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्यासाठी एकवटले पाहिजे. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे आणि आता शैक्षणिक आरक्षणावर घाव घातला जात आहे. त्यामुळे समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे आणि आरक्षण वाचवले पाहिजे. मराठा समाजाला इडब्ल्यूबीएस आणि एसईबीसीचे आरक्षण आहे. तर त्यांना ओबीसीमध्ये येण्याची काय गरज आहे? ओबीसींची मुले आता कुठे शिक्षण घेऊ लागली आहेत. मात्र मराठा समाजामुळे यात अडथळा निर्माण होत आहे, असे नवनाथ वाघमारे यांची कन्या म्हणाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR