सोलापूर : प्रतिनिधी
टेंभुर्णी-महाराष्ट्र शासनाच्यावतीने होऊ घातलेले जल पर्यटन रद्द करावे व शासनाने संपादित केलेल्या व वापरात नसलेल्या जमीन शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर करून मिळाव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्यावतीने उजनी धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेण्याचे आंदोलन माढा तालुका धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी उजनी परिसरातील शेतकरी एकत्र आले होते. शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन बराच
काळ घालवला. मात्र, पोलीस निरीक्षक दीपक पाटील व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला पोलीस अधिकारी यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनकर्ते सुरेश पाटील म्हणाले की, वरिष्ठ पातळीपासून शासकीय अधिकारी यांनी कसलेही सहकार्य केले नाही. धरणग्रस्तांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. शासनाने जल पर्यटन प्रकल्प रद्द करावा व शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर करून द्याव्यात अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल.
उजनी धरण व्यवस्थानचे कार्यकारी अधिकारी मोरे यांनी हा धोरणात्मक निर्णय असून तो अधिकार शासनास आहे, असे सांगितले. यावेळी अमोल पाटील, परमेश्वर मेटे, विष्णू मेटे, बाळासाहेब मेटे, बाबासाहेब पानबुडे, प्रशांत पाटील, अक्षय पाटील, बाळासाहेब पाटील, नाना मेटे, शिवाजी मेटे, बंडू पानबुडे, ज्योतीराम मेटे, गणेश पाटील, मोहन पाटील, बाबा काळे, रमेश मेटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.