जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात आता पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे .तालुक्यातील नागरिकांना हा उन्हाळा आहे की पावसाळा हा प्रश्न पडू लागला आहे. जळकोट तालुक्यात सलग तिस-या दिवशी जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. संध्याकाळी उशीरापर्यंत पाऊस सुरूच होता.
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले, यामुळे जिकडे- तिकडे पाणीच पाणी झाले होते. तालुक्यात सतत पडणा-या पावसामुळे उन्हाळी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. आज जरी पाऊस उघडला तरी आठ दिवस शेतीमध्ये उन्हाळी कामे करता येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे यानुसार जर मान्सून ५ जूनच्या अगोदर आला तर मात्र शेतक-यांची पंचाईत होणार आहे .
सध्या उन्हाळी शेंगा काढणे सुरू असून जळकोट तालुक्यातील शेंगा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे . यासोबतच उन्हाळी ज्वारीचे नुकसान झाले असून ज्वारी पूर्णपणे काळी झाली आहे , यासोबतच कडब्याचहीे नुकसान झाले आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक वेळा वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला परंतु असा पाऊस झाला नसल्याचे अनेक वयोवृद्ध नागरिकांचे म्हणणे आहे