24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात ५० विद्युत पोल, ५ डीपी मोडकळीस

जळकोट तालुक्यात ५० विद्युत पोल, ५ डीपी मोडकळीस

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यामध्ये दि २ जूनच्या रात्री अचानक वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या  मुसळधार पावसामुळे तालुक्यात मेन लाईन आणि एलटी लाईनचे ५० पोल मोडून पडले  तर पाच विजेच्या डीपी भुईसपाट झाल्या आहेत. यासोबतच शेकडो वृक्ष शिवारामध्ये उन्मळून पडले आहेत. या झालेल्या वादळी वा-यामुळे महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
  जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरामध्ये वादळी वा-यामुळे सर्वात अधिक नुकसान झाले आहे. सायंकाळी अचानक आभाळ भरून आले व जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस झाला. जवळपास अर्धा ते एक तास जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. काही क्षणांमध्येच अनेक विजेचे पोल मोडून पडले तर काही पोल जमिनीतून उपसून पडले. यासोबतच पाच डीपीही मोडून पडल्या. प्रचंड वारा आणि पावसामुळे अनेक गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वादळी वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेली .  तालुक्यात जिरगा येथे दोन डीपी, ढोर सांगवी येथे दोन डीपी  तर विराळ येथे एक डीपी भुई सपाट झाले आहे. अनेक गावांमध्ये विद्युत पूल पडल्यामुळे रात्रभर बहुतांश गावांचा विद्युत पुरवठा खंडित होता तर गत २४ तासापासून अनेक गावे अंधारात आहेत. ज्या ठिकाणी पोल पडला आहे अशा ठिकाणी त्या पोलचा विद्युत पुरवठा खंडित करून मागच्या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महावितरणने केला आहे.
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसरात सर्वाधिक नुकसान झाले यासोबतच सोनवळा, तिरुका, करंजी, माळहिपरगा  या परिसरातही वादळी वा-यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वांजरवाडा परिसरात तर प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीला तलावाचे स्वरूप आले होते तर हलक्या जमिनीमधून पाणी बाहेर पडले होते. या झालेल्या वादळी वा-यामुळे जळकोट शहराचाही विद्युत पुरवठा खंडित झाला होता परंतु महावितरणच्या कर्मचा-यांनी रात्री उशिरा
जळकोटचा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR