जळकोट : प्रतिनिधी
जळकोट येथे सुसज्ज अशा सर्व सोयीनियुक्त नवीन बस स्थानकासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. निधी मंजूर होऊन तीन ते चार महिन्याचा कालावधी झाला तरी काम सुरू होत नव्हते मात्र आता लवकरच जळकोट बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरुवात होणार आहे.
जळकोट हे तालुक्याचे ठिकाण आहे यामुळे या ठिकाणी सुसज्ज असे बसस्थानक मंजूर करावे अशी मागणी जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, संजय गांधी निराधार योजना कमिटीचे माजी अध्यक्ष संग्राम हासुळे पाटील यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी परिवहनमंत्र्याकडे पाठपुरावा करून जळकोटला नवीन बसस्थानकाची इमारत मंजूर करून घेतली. या इमारतीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. आता या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. उभारणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ,
जळकोट येथील बस स्थानकामध्ये सध्या साफसफाईचे काम सुरू आहे. बस स्थानक परिसरामध्ये असणारी वृक्ष बाजूला काढले जात आहेत जळकोट मध्ये होणारी नूतन बस स्थानकाची इमारत टोले जंग होणार आहे. दोन्ही बाजूंना बसेस थांबतील अशी प्लॅटफॉर्मची व्यवस्था असणार आहे तसेच चालक आणि वाहकांना थांबण्याची व्यवस्थाही असणार आहे. जळकोट तालुक्याला साजेसे असे नवीन बस स्थानक होणार आहे