जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्याची निर्मिती सन १९९९ साली राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली. यामुळे जळकोटला शहराचा दर्जा प्राप्त झाला . असे असले तरी हा तालुका अतिशय लहान आहे या तालुक्यांमध्ये गावांची संख्याही कमी आहे यामुळे जळकोट शहर म्हणावे तेवढे मोठे होऊ शकलेले नाही. सन २०१६ या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूर रोड जळकोट मुखेड बोधन हा १३४ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग मंजूर केला परंतु पाठपुरावा न झाल्यामुळे जळकोट येथून रेल्वे धावण्याचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.
या मार्गासाठी गत आठ वर्षानंतरही जमिनीचे संपादनही होऊ शकले नाही . फक्त प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. जळकोट परिसरातून रेल्वे मार्ग गेला असता तर अविकसित तालुका तसेच परिसराचा विकास झाला असता परंतु काहीच प्रक्रिया झाली नाही . गत काही महिन्यापूर्वी एफएलएस सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु यापुढील प्रक्रिया थंड बस्त्यात गेल्यामुळे, नागरिकांचाहीहरमोड झाला आहे. या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा कमी पडत आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा करून नांदेड – देगलूर – बिदर या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळवून घेतली.
या रेल्वे मार्गासाठी जो लागणारा खर्च आहे त्याचा अर्धा वाटा राज्य सरकार उचलणार असल्याचे हमीपत्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे पाठवलेले आहे, यामुळे या रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बोधन ते बिदर व लातूर रोड ते नांदेड या रेल्वे मार्गाच्या एफ. एल. एस रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने कोट्यवधीचा निधी मंजूर केला आहे. जळकोटहून जाणारा रेल्वे मार्ग २०१६ साली मंजूर झाला . या रेल्वे मार्गाचे एफ .एल.एस सर्वेक्षण करण्यास २०२३ ला मंजुरी मिळाली.