16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरजळकोट येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करावे

जळकोट येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करावे

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० गेलेला आहे तसेच जळकोट तालुक्यातून दुसरा एक राज्य महामार्ग गेला आहे. या महामार्गावर वर्षभरातून अनेक अपघात होतात परंतु उपचाराअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे यामुळे महाराष्ट्र सरकारने जळकोट या ठिकाणी सुसज्ज असे ट्रामा केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे .

नांदेड – जांब- जळकोट- घोणसी- उदगीर- गुलबर्गा हा राष्ट्रीय महामार्ग ५० झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. नांदेड येथील गुरूद्वारा व बिदर येथील गुरुद्वारा या दोन्ही मधील अंतर जळकोट मार्गे खूप कमी आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांची संख्याही वाढली आहे . हा मार्ग झाल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीपेक्षा या रोडवर वाहतूक वाढली आहे. वाहतूक वाढल्यामुळे तसेच प्रवासी वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे. एखादा अपघात झाल्यास जळकोटपासून पुढे नांदेडपर्यंत कुठलीही वैद्यकीय सुविधा नाही, तसेच जळकोटपासून उदगीरपर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. यामुळे अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

नांदेड -जळकोट -उदगीर या राष्ट्रीय महामार्गावर गत दोन वर्षात अनेक अपघात झाले यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला तसेच शिरूर ताजबंद- जांब-मुखेड या राज्य महामार्गावरही अपघात झाले यात उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू झाला. जळकोट येथे ग्रामीण रुग्णालय आहे परंतु या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा नाहीत. अपघात विभाग कार्यरत नाही. अपघातात एखादा व्यक्ती गंभीर जखमी झाला असल्यास त्याच्यावर फक्त जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार होतात. अधिक उपचारासाठी या व्यक्तीला इतरत्र रेफर केले जाते. रेफर करण्यामध्ये खूप वेळ जातो यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येत आहे. जळकोट तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग गेला आहे. या मार्गावरील अपघात पाहता अपघातग्रस्तांना लवकर उपचार मिळावेत त्यांचा जीव वाचावा यासाठी जळकोट या ठिकाणी सरकारने ट्रामा केअर सेंटर उभे करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR