जळकोट: प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये मान्सून पूर्व जोरदार पाऊस झाला. दि. ४ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास जळकोट शहरात तर वादळी पावसाने झोडपून काढले. केवळ २० ते ३० मिनिटे पडलेल्या पावसाने जळकोट शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. जळकोट शहरात या अर्ध्या तासाच्या पावसाने नागरिकांची दाणादाण उडवली.
जळकोट शहरात झालेल्या या पावसामुळे नालीचे पाणी अनेक दुकानांमध्ये शिरले, यामुळे अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले . यासोबतच अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरले . रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली . विशेष म्हणजे नालीचे घाण पाणी रस्त्यावर साचून राहिले या घाण पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागली . जळकोट शहरांमध्ये गुुरुवारी सायंकाळी मान्सूनपूर्व जोरदार पाऊस बरसला . वादळ आणि पावसाचे प्रमाण प्रचंड होते . काही वेळा मध्येच रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. जळकोट शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले तसेच घरामध्ये देखील पाणी शिरले. यावेळी नगरसेवक धोंडूतात्या पाटील यांनी संबंधित भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगरपंचायतीच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले.
















