जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये सध्या पशूंच्या चा-यांचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. यामुळे जनावरे सांभाळणा-या शेतक-यांंना इतर ठिकाणासह नातेवाईकाकडे चारा मिळेल का. याची चौकशी करून चा-याचा शोध सुरू झाला आहे . आगामी काळात म्चारा टंचाई होणार आहे या भीतीने आतापासूनच शेतक-यानी चारा जमवण्यास सुरुवात केली आहे. जळकोट तालुक्यामध्ये गत ऑगस्ट महिन्यापासून पाऊस पडला नाही यामुळे बांधावर मोठ्या प्रमाणात चारा उगवला नाही. पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम शेतक-यांंचा वाया गेला तसेच रब्बी हंगामही म्हणावा तेवढा नाही यामुळे शेतक-यांचा जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे . माणसे जगतील परंतु जनावरे कशी जगतील याचा प्रश्न शेतक-याना पडला आहे. यावर्षी ज्वारीचे पीकही म्हणावे तेवढे नाही यामुळे तालुक्यात कडव्याची टंचाई आहे तसेच उन्हाळी ज्वारी घ्यावे म्हटले तर शेतक-याजवळ पाणी नाही . इतर चारा वर्गीय पिके घेणे आता शक्य होणार नाही कारण जलस्त्रोतांमध्ये उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकणार नाही याची भीती . दरवर्षी शेतकरी आपल्या शेतामध्ये उन्हाळी मका टाकत असतात परंतु या वर्षी पाऊसच नसल्यामुळे येणा-या काळात जनावरांना मका पण मिळणार नाही.
सध्या पशुखाद्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळकोट तालुक्यात अनेक शेतक-यानी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात म्हशी पाळण्यास सुरुवात केली आहे परंतु आता असे शेतकरीही आता अडचणीत आलेले आहेत. बाजारातून पशुखाद्य आणायचे म्हटले तर ५० किलोच्या पशुखाद्याचीकिंमत दीड हजार रुपयापर्यंत गेलेली आहे. जसे पशुखाद्य वाढले तसे मात्र दुधाचे भाव वाढले दिसून येत नाहीत त्यामुळे दुग्धउत्पादक शेतकरीही आता संकटात सापडले आहेत . आता येणा-या काळामध्ये चा-याचे भावही गगनाला भिडणार आहेत. वर्षी कडब्याची एक पेंडी पंधरा रुपयाला गेली होती. यावर्षी मात्र यापेक्षा अधिक भाव होणार आहे. यामुळे शेतक-यांमध्येचिंंतेचे वातावरण पसरले आहे.