जळगाव : प्रतिनिधी
गुजरात राज्याकडून अकोला येथे जाणा-या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुरत येथून लक्झरी बस एरंडोल मार्गे मलकापूर येथे जात होती. लक्झरी बसवर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते. धरणगाव तालुक्यातील वारडसिम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका साईडला झाल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले.
यानंतर लक्झरी बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटली. या अपघातात एक महिला जागीच ठार तर, दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. कविता सिद्धार्थ नरवाडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सोपान नारायण सपकाळ, विठ्ठल अमृत कोगदे, विश्वनाथ नामदेव वाघमारे, प्रशांत गजानन धांडे यांच्यासह दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना खासगी वाहनातून जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.