22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरजायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार!

जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार!

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पैठण : प्रतिनिधी
नाशिक व नगर भागातील सर्व ९ धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यातच नाथसागर जलाशयात ३४ हजार ३१८ क्युसेक्सप्रमाणे पाण्याचा जलौघ येतच असून प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी केवळ १२ टक्के पाण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागेल. त्यामुळे नदिकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. असे आवाहन करणारे पत्र कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नगर व नांदेड या ५ जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना पाठवले आहे.

१५२२ फुट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आज सकाळी १५२० पाणीपातळीची नोंद झाली. प्रकल्प पुर्णक्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २ फुट पाणीपातळीची गरज आहे. त्यातच वरच्या भागातील सर्व ९ छोटीमोठी धरणे तुडुंब भरली असून सध्या जायकवाडीत ३४ हजार ३१८ क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाण्याची आवक चालू आहे. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दि. १ सप्टेंबर रोजी रात्रीच वरील ५ जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना पत्र दिले आहे. यात म्हटले आहे की, ‘‘पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधुन गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल.

तसेच जायकवाडी धरणाच्या निम्न बाजुचे आपेगाव, हिरडपुरी, जोगलादेवी, मंगरुळ, राजाटाकळी, लोणी व सावंगी या गोदावरीवरील उच्च पातळी बंधा-यांचे दरवाजे सुद्धा कोणत्याही उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल. त्यामुळे खबरदारी म्हणून जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधा-यांच्या निम्न बाजुच्या गोदावरी किना-या लगतच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पशुधन, रस्ते, पुल व वास्तु यांची खबरदारी घेणेबाबत सर्व संबंधीतांना निर्देश व्हावेत.’ अशी विनंतीही या पत्रात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR