जालना : प्रतिनिधी
जालन्याच्या गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा झाला असून घटनेतील दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
दरम्यान, जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी रहात असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना मंगळवारी (दि. ४) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास घडली. दोन गटांतील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले.
दरम्यान, दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच ज्या कुणी शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सदरील प्रकरण हे हिंदू-मुस्लिम नसून शेजारी राहणा-या युवकांमधील किरकोळ कारणावरील भांडण असून, शहरामध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरवू नये आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.