30.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमहाराष्ट्रजालन्यात ५० कोटींचा घोटाळा

जालन्यात ५० कोटींचा घोटाळा

शेतक-यांच्या नावाने सरकारी अधिका-यांनी पैसे लाटले

जालना : प्रतिनिधी
जालन्यात शेतक-यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचे तब्बल ५० कोटी रुपये अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी हडप केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून हा तलाठ्यांनी आणि ग्रामसेवकांनी हा घोटाळा केला आहे. एकाच शेतक-याच्या नावावर वेगवेगळे श्ङ नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

२०२३ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या शेतक-यांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देखील मंजूर करण्यात आले. मात्र या अनुदानापैकी तब्बल ५० कोटी रुपये काही तलाठी, ग्रामसेवक आणि कृषि सहायकांनी हडप केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान या घोटाळ्याची प्रशासनाकडून सध्या गुप्त चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घोटाळ्यात किती तलाठी, ग्रामसेवक आणि कृषि सहाय्यकांचा सहभाग आहे, ते समोर येणार आहे. दरम्यान आतापर्यंत जालन्यातील अंबड आणि घनसावंगीतील ८० गावांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील इतरही गावांची तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान अतिवृष्टी घोटाळा नियोजितपणे झाला असून हा घोटाळा ५० कोटींचा नसून १०० कोटींचा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. दरम्यान अतिवृष्टी घोटाळा झाल्याचे जालन्याच्या उपजिल्हाधिका-यांनी कबूल केले असले तरी नेमकी किती रुपयांचा घोटाळा झाला हे चौकशीनंपरच पुढे येणार आहे.

बोगस याद्या जोडून अनुदान उचलले
पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या होत्या, काही ठिकाणी बोगस याद्या जोडून अनुदान उचललेले आहे. या तक्रारीनंतर जानेवारीमध्ये जिल्हाधिका-यांनी एक समिती गठित केली आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या दोन तालुक्यांतील ७५ ते ८० गावांमध्ये तलाठ्यांनी अपलोड केलेल्या ज्या याद्या होत्या त्याची प्राथमिक तपासणी चौकशी समिती करत आहे. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

चौकशी समितीमध्ये तीन अधिका-यांचा समावेश
१) पुलकित सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंबड
२) मनीषा दांडगे, उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय जालना
३) नीलम लुनावत, नायब तहसीलदार रोहयो जिल्हाधिकारी कार्यालय जालना

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR