नांदेड : विशेष प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर जिल्ह्यातील ५१ माजी नगरसेवकांनी जाहिरपणे भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महिला पदाधिका-यांनीदेखील सामूहिकरित्या राजीनामे देत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचा गड ढासळला आहे. त्यामुळे भविष्यात आजी -माजी आमदारदेखील भाजपात डेरेदाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
खा.अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपात जुन्या-नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दृश्य आजघडीला तरी दिसत आहे. भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही. परंतु खा.चव्हाणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय ब-याच आजी -माजी नगरसेवक तथा महिला काँग्रेस कमिटीनेदेखील घेतल्यामुळे जिल्ह्यात भाजपाचे नवी2न वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात भाजपचे दोन नवे नेतृत्व निर्माण झाले आहे. एक खा.प्रताप पाटील चिखलीकर तर दुसरे खा.अशोकराव चव्हाण. या दोन खंबीर नेतृत्वामुळे भाजपाला आता नवी शक्ती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आता नगण्य पदाधिकारी राहिले आहेत. अनेक पदाधिकारी अद्यापही तळ्यात मळ्यात आहेत.
काँग्रेसला खंबीर नेतृत्व उरले नसल्यामुळे नव्वदीतील माजी आ.ईश्वरराव भोसीकर यांची कास धरावी लागली. यामध्ये त्यांनी आपले चिरंजीव संजय भोसीकर यांची नियुक्ती लोहा विधानसभा मतदारसंघावर निरीक्षक म्हणून केली. तर मुखेड येथे दिलीप पाटील बेटमोगरेकर, भोकरमध्ये बाळासाहेब रावणगावकर, देगलूर – गंगाधर मिसाळे, किनवट -गिरीश नेमानीवार, हदगाव -राजेश फुलारी, नांदेड – उत्तर – सुरेंद्र घोडजकर, नांदेड दक्षिण – श्रीनिवास मोरे, नायगाव – संजय शेळगावकर. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून निवड केल्यामुळे ब-याच जुन्या लोकांना या निमित्ताने संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नांदेडवर विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी वसंतराव चव्हाण व ईश्वरराव भोसीकर यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी दिली असली तरी जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते खा.चव्हाणांच्या बाजूने बोलत आहेत. आम्ही साहेबांसोबत अजूनही आहोत, असे सांगत आहेत.
सर्वप्रथम अशोकराव चव्हाण व आ.अमरनाथ राजूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेडच्या काँग्रेसला खिंडार पडणार हे जवळपास निश्चित झाले. या अनुषंगाने ‘अमरभाऊ की एन्ट्री, अब बजेगी सबकी घंटी’ असे वृत्त एकमतने तात्काळ प्रकाशित केले होते. त्यानुसार आता काँग्रेसचा ढासळत असल्याचे दृश्य नांदेडकर पाहात आहेत. ५१ नगरसेवकांनंतर महिला काँग्रेसच्या मंगला निमकर, ललिता शिंदे, मंगाराणी अंबुलगेकर, सुमती व्याहाळकर, शैलजा स्वामी, श्रद्धा चव्हाण, अनिता हिंगोले, कविता कळसकर, रेखा चव्हाण, जयश्री पावडे, बलजितकौर, मोहिनी येवनकर, संगीता डक, संध्या अंबेकर, जयश्री तोडकरी, अनुजा तेहरा यांच्यासह अनेक महिलांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँगे्रसचा गड ढासळून जिल्हा भाजपमय झाल्याचे दिसून येत आहे.