नांदेड : विशेष प्रतिनिधी
शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शिवपुराण कथास्थळाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाल्याने मंडपात मुक्कामी असलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. जमा झालेले पाणी कसे काढावे यासाठी भाविकांना प्रश्न पडला होता. आता आपले कसे होईल, आपले वास्तव्य कुठे होईल, रात्री अशीच काढावी लागेल का, अशा अनेक प्रश्नांनी भाविकांना भंडावून सोडले होते. यावेळी मात्र जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस दल व लोकप्रतिनिधी धाऊन आले आणि सर्वच समस्या निकाली लागल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे अश्रू आले. त्यामुळे असेच म्हणावेसे वाटते, या सर्व योद्ध्यांना नांदेडकरांचा सॅल्युट!
शुक्रवारची रात्र नांदेडकरांसाठी वै-याची रात्र होती. अचानकपणे ढगफुटी झाल्यामुळे २५ ते ३० हजार भाविकांची व्यवस्था कशी करावी? हा प्रश्न जिल्हा प्रशासनासह नांदेडकरांना पडला होता. वा-यासारखी बातमी पसरताच संपूर्ण नांदेड शहर मदतीसाठी धावून आले. बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, व्यापारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते कौठा परिसरात धाव घेतली. प्रत्येक जण मदतीचा हात देत होता. दरम्यान कथा मंडपात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मडपाची परिस्थिती बिकट झाली होती. भाविकांना तेथे थांबणे शक्य नसल्याने त्यांना अन्य ठिकाणी हलविणे आवश्यक होते. यावेळी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस दलाने धाव घेतली.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या. भाविकांना मदत करण्याबरोबरच तेथील वाहतुकीचे नियोजन सुरळीत पोलिसांनी पार पडले. त्यांच्यासोबतच लोकप्रतिनिधीदेखील मैदानात उतरले आणि मदतीला सुरूवात झाली. वाहनांची कमतरता होती त्यामुळे अडिअडचणी निर्माण झाली. परंतु प्रशासनाच्या मदतीने या सर्व भक्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून व स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली. माजी खा.प्रताप पा. चिखलीकर, आ.मोहन हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, यांच्यासारखे लोकप्रतिनिधी रात्रभर कथास्थळी उभे राहून भाविकांना मदत करीत होते. प्रशासनाच्या बरोबरीने त्यांनी आपल्या सहका-यांसह भाविकांना मदत केली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वरकड, जिल्हा चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी, तलाठी अशा ६५ जणांच्या महसूल विभागाच्या टीमने पावसामध्ये अडकलेल्या भक्तांना खासगी बसद्वारे व्यवस्था करून दिली.
पोलिस प्रशासनाने प्रत्येकाला रस्ता दाखवून अनेकांना अपघातापासून वाचविले. महापालिका प्रशासनाने नागार्जूना स्कुल, ओम गार्डन, गुरुद्वारा आदी ठिकाणी भक्तांना पोहचविले. यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिकेचे आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंग संधू, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख मिर्झा बेग, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांच्यासह सर्वच टीम रात्रभर कथास्थळी उपस्थित राहून साचलेले पाणी काढत होते. उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी तर सर्पमित्रांची टीमदेखील त्या ठिकाणी बोलावली होती. या सर्वांच्या प्रयत्नामुळे आज भक्त मंडळी सुखावली आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस दल, महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या कार्याला नांदेडकरांनी सॅल्युट केला आहे.