लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक, ग्रामपंचायत विभागातील उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायत अधिकारी यांचा गौरव करण्यासाठी ‘जिल्हा शिक्षक व ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण समारंभ २०२६ आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विश्व पॅलेस मंगल कार्यालय, डी. मार्ट रिंग रोड, लातूर येथे होणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून पुरस्कार वितरण रखडले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे नियोजन झाले खरे. परंतु २०२६-२७ मध्ये देण्यात येणा-या पुरस्कारार्थींच्या नावावर अद्याप विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी शिक्कामोर्तबच केलेले नाही. त्यामुळे या पुरस्कारांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या ५ वर्षापासून शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड होत होती. मात्र, पालकमंत्र्यांची तारीख मिळाली की पुरस्कार वितरण होणार, असा शब्द पुरस्कारप्राप्त शिक्षकांना ऐकायला मिळत होता. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षकांना ड्रेस देण्यात येतो. तो देऊनही अनेक दिवस उलटून गेले. त्यामुळे त्या शिक्षकांना नव्याने जिल्हा परिषद ड्रेससाठी तरतूद करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणरायाचे आगमन उद्या होत आहे. याचदरम्यान शिक्षकांचा पुरस्कर सोहळा होणार असल्याची तारीख जाहीर झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासोबतच या कार्यक्रमात २०१९-२० ते २०२२-२३ या कालावधीतील ग्रामपंचायत विभागातील निवड झालेल्या आदर्श ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींच्या नावांच्या स्वतंत्र याद्या जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात आल्या असून त्यानुसार पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिका-यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
















