लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करुन त्यांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत २३ व २४ मे रोजी विशेष मोहीम राबवून प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात येणार आहे. यासाठी ‘दोन दिवस गाळमुक्तीचे, लातूरच्या विकासाचे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गाळमुक्त धरण, गाळयुक्त्त शिवार अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या जिल्ह्यातील ३७ प्रकल्पांमधून सुमारे १४ लक्ष घनमीटर गाळ या अभियानांतर्गत उपसण्यात आला आहे. या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनीही गाळ उपसा कामांना भेटी देवून शेतक-यांशी संवाद साधला आहे.
पावसाळ्यापूर्वी सिंचन प्रकल्पांमधील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून येत्या २३ व २४ मे रोजी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होवून शेतक-यांनी गाळरुपी काळे सोने आपल्या शेतात नेवून टाकावे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल, तसेच तलावातील गाळ उपसा झाल्याने पाणी साठवण क्षमतेतही वाढ होईल. या उपक्रमात स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा यांनीही सहभागी व्हावे. या यंत्रणांनी आगामी पावसळ्यात वृक्ष लागवड मोहिमेसाठी निवडलेल्या जागेवर तलावातील गाळ आणून टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.