24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रजिल्ह्याला काळीमा फासणारी घटना : पंकजा मुंडे आक्रमक

जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना : पंकजा मुंडे आक्रमक

बीड : प्रतिनिधी
बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिकणा-या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या प्रकरणात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी संपर्क साधून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी ही घटना ‘जिल्ह्याला काळीमा फासणारी’ असल्याचे म्हणत कठोर कारवाईची मागणी केली.

तक्रारीनुसार, शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार हे गेल्या वर्षभरापासून तिचा वारंवार लैंगिक छळ करत होते. हे गंभीर प्रकरण उघड झाल्यानंतर लगेचच पंकजा मुंडे यांनी पोलीस यंत्रणेला कार्यरत केले आणि संबंधित गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश दिले.

पंकजा मुंडे यांनी पालकांना आवाहन केले आहे की, जर अजून कोणी अशाच प्रकाराच्या छळाचा बळी ठरले असेल, तर त्यांनी भीती न बाळगता पुढे यावं, आणि शासन त्यांना पूर्ण सुरक्षा देईल, अशी हमी त्यांनी दिली आहे. त्यांच्या मते, शिक्षकांचे हे वर्तन शिक्षण संस्थेच्या मूल्यांना काळिमा फासणारे असून, त्यांना माफ करता येणार नाही.

दुसरीकडे, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) नेते धनंजय मुंडे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत, आरोपींसोबत संबंध असल्याचा गंभीर दावा केला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

धनंजय मुंडेंच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता. पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी फार मोठा अन्याय सहन केला आहे. आरोपींना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांची मजल इतकी वाढली आणि पोलिसांनीही वेळेत कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR