लातूर : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखविले की ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या पुढे जात, धर्म, पंथाला शून्य किंमत असते. ज्ञानाच्या बळावर जग जिंकता येते, हा आत्मविश्वास ठेवून त्यांनी भारतीय घटना लिहिली आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कल्याणकारी तरतुदी करून ठेवल्या. त्यामुळे आज समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस हक्काने जगत असून ताठ मानेने आपले विचार मांडू शकतो. व्यवसाय करू शकतो, जगू शकतो ही एक ताकद फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे मिळाली, असे मत भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. गोविंदराव घार यांनी व्यक्त केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयक्रांती महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १८ तास वाचन उपक्रम साजरा करण्यात आला व बाबासाहेब यांच्या विषयी लिहिलेली ग्रंथालयात संग्रहित असलेले ९० हुन अधिक ग्रंथांचे प्रदर्शन करून व विद्यार्थ्यांना हवा तो ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देऊन अभिनव पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा. गोविंदराव घार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, प्रा. डॉ. मनोहर पलमट्टे, ग्रंथपाल डॉ. रिता कदम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. केशव अलगुले, डॉ. प्रमोद चव्हाण, डॉ. संगीता घार, डॉ. हरिश्चंद्र चौधरी, डॉ. रामेश्वर स्वामी, डॉ. दिलीप गुंजरगे, डॉ. राजेश्वर खाकरे, डॉ. राजाभाऊ पवार, डॉ. सतीश डांगे डॉ. अविनाश पवार, डॉ. धीरज कोतमे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. चौधरी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रसिद्ध राजकीय नेते, प्रख्यात कायदे तज्ञ, तत्त्वज्ञानी व विद्वान संपादक होते. डॉ. आंबेडकर हे एक अग्रगण्य समाज सुधारक आणि कार्यकर्ते होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. सर्वसामान्य दलित समाजाच्या उद्धारासाठी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.
त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचे आज अधिकार प्राप्त झाले. प्राचार्य डॉ. कोल्हे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीत योगदान मोलाचे होते. त्यांच्या कार्यामुळे आणि भाषणामुळे डॉ. बाबासाहेबआंबेडकर भारताच्या संविधान निर्मितीत प्रक्रियेतील प्रमुख व्यक्ती महत्त्व बनले होते. आंबेडकर यांचे विचार समता, न्याय, बंधुत्व समाजामध्ये प्रस्थापित करणे गरजेचे आहे. आपण वाचन संस्कृतीत जोपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ. रीता कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेश करंजकर, प्रा. शिवराज बाजुळगे, प्रा. प्रकाश भिंगे, प्रा. प्रज्ञा स्वामी, प्रा. सुवर्णा शिंदे, संजीवनी मराठे, रामदास जाधव यांनी परिश्रम घेतले.