१४ वर्षे मंत्रिपद, ६ वेळा भोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे आज निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
अनंतराव थोपटे हे पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. भोर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास ३० वर्षे प्रतिनिधित्व केले. ते १४ वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडील होते.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजकारणात थोपटे घराण्याचे नाव मोठे आहे. त्यांनी एकूण १४ वर्षे मंत्रिपद भूषवले. ते एकूण ६ वेळा भोर मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.
काँग्रेस पक्षात त्यांच्या शब्दाला मोठा मान होता. अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनंतराव थोपटे यांना १९८३ साली पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अनंतराव थोपटे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यमंत्रिपद दिले. त्यानंतर ते अनेक वर्षे कॅबिनेटमंत्री राहिले.
राजकीय क्षेत्राची न भरून निघणारी हानी : माजी मंत्री दिलीपराव देशमुख
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी शिक्षणमंत्री अनंतराव नारायणराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भोर विधानसभा मतदारसंघातून सलग ६ वेळा आमदार म्हणून निवडून येणारे आणि तब्बल १४ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची धुरा सांभाळणारे एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व आज आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची मोठी आणि न भरून निघणारी हानी झाली आहे.राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्यांना देशमुख परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र जुन्या जाणत्या
लोकनेत्यास मुकला : सुळे
राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे साहेब यांनी आपल्या कार्यकाळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांनी अनेक वर्षे भोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना तेथील जनतेशी अतिशय जवळचे नाते निर्माण केले होते. थोपटेसाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका जुन्या जाणत्या लोकनेत्यास मुकला, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
















