22.9 C
Latur
Thursday, September 4, 2025
Homeमहाराष्ट्रझेपत नसेल तर राजीनामा द्यावा

झेपत नसेल तर राजीनामा द्यावा

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन जर यांना सांभाळता येत नसेल, कायदा सुव्यवस्था राखता येत नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्राचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कमी पडत असेल तर हे सरकार हटवले पाहिजे. राज्यात आणि राज्याच्या राजधानीत महिला जर सुरक्षित नसतील तर गृहखाते काय करत आहे. या सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत आहे. गृहमंत्र्यांना जर हे झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे.

आझाद मैदान येथे सुरु असलेले मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मराठा समाजाचे आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल होत आहेत. सीएसएमटी स्थानकात आंदोलकांनी गर्दी केली आहे तर आझाद मैदान परिसर तसेच रस्त्यांवर फक्त आंदोलक दिसत आहेत. मुंबईत गणपती उत्सव काळात आंदोलन होणार याची माहिती राज्य सरकारकडे होती. गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली होती. त्यानंतरही त्यांनी काही केले नाही. आज आंदोलन स्थळी जर काही घडत असेल तर त्यासाठी राज्य सरकार आणि गृहविभाग जबाबदार आहे. त्याचे इंटेलिजन्स काय करत आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

सरकार अडचणीत आले तर शरद पवारांची आठवण
मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार का बोलत नाहीत, त्यांनी यावर काही तोडगा काढावा असे सत्ताधा-यांकडून म्हटले जात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता महायुती आणि त्यांच्या पक्षांकडे आहे. मात्र जेव्हा सरकार अडचणीत येते तेव्हा त्यांना शरद पवारांची आठवण होते. आमचा पक्ष छोटा, आमचे किती असे आमदार आणि खासदार आहेत, असे आम्हाला नेहमी म्हटले जाते. मात्र आता सरकार अडचणीत आले तर त्यांना शरद पवारांची आठवण होत आहे का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

आंदोलन पूर्वनियोजीत होते
मनोज जरांगे यांनी चार महिने आधी सरकारला आंदोलनाची माहिती दिली होती. या काळात मुंबईत गणपती उत्सव आहे, याची माहिती सरकारला नव्हती का. किमान आंदोलनाच्या आठ दिवस आधी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावायला पाहिजे होती. यावर सरकारची भूमिका काय आहे हे सांगायला पाहिजे होते. मात्र सरकारने गेल्या चार महिन्यात काहीच केले नाही, अजूनही वेळ गेलेला नाही. राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवा. विधानसभा बोलवा आणि आरक्षणावर मार्ग काढा. जर घटना दुरुस्ती करायची असेल तर तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवा. दिल्लीतही तुमचेच सरकार आहे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

भाजपकडे २५० अधिक आमदार ३०० खासदार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांच्याकडे मराठा आरक्षणावर मार्ग होता. तेव्हा ते म्हणत होते की, ‘व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे ’मात्र आता २५० अधिक आमदार ३०० खासदार तुमच्याकडे आहे. तुम्ही आता सत्तेत असताना मार्ग काढला पाहिजे.

आंदोलकांना रसद कोण पुरवते
मराठा आंदोलनाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे? याची माहिती आमच्या नेतृत्वाकडे आहे. योग्यवेळी आमचे नेतृत्व त्याचा खुलासा करेल, असा दावा गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट प्रत्युतर दिले. त्या म्हणाल्या की, आंदोलकांना रसद कोण पुरवते हे स्पष्ट करा. आरक्षणाला रसद कोण पुरवत आहे हे आरोप करणा-यांनी स्पष्ट करावे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या.

तरूण मुले आहेत …
खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर बाहेर पडताना त्यांना एक वाईट अनुभव आला. यावर सुळे म्हणाल्या, इतके मोठे आंदोलन सुरू आहे, एखादी अशी गोष्ट घडने ठिक आहे. तरूण मुले आहेत, त्यांच्या काही भावना असतात. माझी नैतिक जबाबदारी असल्याने मी काल तिथे गेले. युवा मुलांच्या मनात काही भावना असतात. पाटलांची तब्येत खराब झाली होती, मी तिथे केले. थोडक्यात चर्चा झाली. माझी राज्याच्या सरकारला आणि मुंबई महापालिकेला विनंती आहे की, आंदोलनाच्या ठिकाणच्या स्वच्छेतेकडे लक्ष दिले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR