सांगली : प्रतिनिधी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ टॅक्सचे काळे ढग सांगली, मिरजेच्या वेशीवरही येऊन धडकले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातून होणारी सुमारे १५०० कोटी रुपयांची औद्योगिक निर्यात रखडण्याची भीती आहे.
ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ जाहीर केले आहे. याचा फटका प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनांना बसणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांकडून अमेरिकेला वर्षाकाठी सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात केली जाते. ट्रम्प यांच्या निर्णयानुसार त्यांना २६ टक्के अतिरिक्त कर लागणार आहे. साहजिकच अमेरिकेत त्यांच्या किमती २६ टक्क्यांनी वाढणार आहेत. या वाढीव किमतीला उत्पादने स्वीकारण्यास अमेरिकन आयातदार तयार नाहीत.
भारतातील उद्योजकांनी आपल्या उत्पादनांच्या किमती २६ टक्क्यांनी कमी कराव्यात, जेणेकरून अमेरिकेतील उत्पादने आहे त्याच किमतीला विकता येतील’, असाही प्रस्ताव अमेरिकेतील उद्योजकांनी दिला आहे. उत्पादनामध्ये नफ्याचे मार्जिन इतके मोठे नसल्याने येथील उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे.
सांगली जिल्ह्यातून अमेरिकेला औद्योगिक आणि कृषी उत्पादने निर्यात होतात. औद्योगिक उत्पादनांमध्ये वाहनांचे सुटे भाग, रसायने, टेक्सटाइल्स, विद्युत पंप व व्हॉल्व्ह, तेल आणि गॅस उत्पादनांशी संबंधित उपकरणांचा समावेश आहे.