वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प पुन्हा जगाला तडाखा देण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रावर २५ टक्के कर लावण्याचे संकेत देतानाच सेमीकंडक्टर चीप आणि औषधांच्या आयातीवरही आयातशुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले. यामुळे नजीकच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील. या घोषणेमुळे भारतातील औषध कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.
ऑटोमोबाईलवरील कर २ एप्रिलपासून लागू करण्यात येईल. परदेशी बाजारपेठांमध्ये अमेरिकन ऑटोमोबाईल निर्यातीवर अन्याय केला जातो, असा दावा ट्रम्प सतत करतात. युरोपात वाहन आयातीवर १०% कर लागतो जो अमेरिकेत २.५% आहे. युरोपियन देशांनी कर कमी करावा असे त्यांना वाटते.
चिप, औषधांवर कर : फ्लोरिडामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, फार्मास्युटिकल आणि सेमिकंडक्टर चिप्सवरही २५% किंवा त्याहून अधिक कर लावला जाईल. हा कर वर्षभरानंतर आणखी वाढवला जाऊ शकतो. येत्या काही आठवड्यात जगातील नामांकित कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच परंतु हा कर नक्की कधी लावला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
रेसिप्रोकल टॅरिफची तयारी : गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी आर्थिक टीमला रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. या योजनेंतर्गत, प्रत्येक देशाने अमेरिकन उत्पादनांवर लावलेल्या टॅरिफप्रमाणेच अमेरिका त्या देशाच्या उत्पादनांवर समान दराने टॅरिफ लावणार आहे.
कोणत्या भारतीय कंपन्यांवर परिणाम : एचएसबीसीच्या अहवालानुसार, भारतीय औषध कंपन्यांचा अमेरिकेत मोठा बाजार आहे. अनेक कंपन्यांना अमेरिकेतून मोठी कमाई मिळते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. अरबिंदो फार्माची ४६% कमाई अमेरिकेतून होते. सिप्लाची २८%, लुपिनची ३७%, डॉ. रेड्डीज लॅबची ४६% आणि टॉरंट फार्मास्युटिकल्सची १०% कमाई एकट्या अमेरिकेतील व्यापारातून होत असते.