शिकागो : वृत्तसंस्था
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरल्यासारखे झाले आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध तर दुसरीकडे आयात शुल्क अशा दुहेरी संकटात जगाची अर्थव्यवस्था सापडली आहे. अमेरिकेला ग्रेट बनवणार असल्याची वल्गना करणा-या ट्रम्प यांच्याविरोधात खुद्ध अमेरिकेच्या फेड रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी टॅरिफ धोरणामुळे महागाई वाढून विकास मंदावू शकतो, असा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता सर्व देशांवरील लादलेल्या टॅरिफला ३ महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. मात्र, आयात शुल्कावरुन पॉवेल यांनी चिंता व्यक्त केली आहे. यांचे गंभीर परिणाम फक्त जगालाच नाही तर अमेरिकेलाही भोगावे लागणार आहेत. शिवाय, आतापर्यंत जाहीर केलेल्या दरांची पातळी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याचेही ते म्हणाले. यामुळे महागाई वाढू शकते, आर्थिक वाढ मंदावू शकते आणि बेरोजगारी निर्माण होऊ शकते. अशा आव्हानांचा सामना फेडरल रिझर्व्हने गेल्या अर्ध्या शतकातही कधी केला नव्हता.
पॉवेल पुढे म्हणाले, वाढत्या महागाईमुळे कामगार बाजारावर दबाव वाढेल. ट्रम्प यांच्या धोरणांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी इतर फेड धोरणकर्त्यांनीही व्याजदर स्थिर ठेवण्याचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. हा भार टॅरिफच्या स्वरुपात जनतेला सहन करावा लागेल.