नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाचा जगभरातील अनेक देशांवर परिणाम होणार आहे. अशातच, या टॅरिफमुळे भारताला चांगलाच फायदा होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराला मान्यता मिळाल्यावर, देशांतर्गत स्तरावर व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास ब्लू स्टार, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, अरविंद आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजसह अनेक कंपन्यांच्या सीईओंनी व्यक्त केला आहे.
डिक्सन टेक्नॉलॉजीज, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, ब्लू स्टार, हॅवेल्स आणि अरविंद यासारख्या आघाडीच्या देशांतर्गत कंपन्यांच्या सीईओंनी विश्लेषकांना सांगितले की, अमेरिकन टॅरिफ परिस्थितीत भारतीय व्यवसाय स्पर्धात्मक राहतात. सध्या चर्चेत असलेला भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार व्यवसायाला चालना देईल.
अमेरिकेने चीनवरील शुल्क १४५% वरून ३०% पर्यंत कमी केले आहे, तर भारतावरील २६% शुल्क सध्या स्थगित करण्यात आले आहे. अशा वेळी सीईओंकडून हा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग कंपनी गोकुलदास एक्सपोर्ट्सने म्हटले की, चीनवरील उच्च कर आणि बांगलादेशातील राजकीय अनिश्चितता, यामुळे किरकोळ अडथळे असूनही सोर्सिंग डेस्टिनेशन म्हणून भारताचे एकूण आकर्षण वाढले आहे. एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेले टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसोझा म्हणाले की, अमेरिकेत निर्यात होणारी कॉफी आणि चहासारखी उत्पादने तिथे उत्पादित केली जात नाहीत, म्हणूनच स्पर्धात्मक परिस्थितीतून आम्ही इतर सर्वांच्या बरोबरीने राहू.