22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमुख्य बातम्याठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

ठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

जागावाटप अंतिम टप्प्यात, १० जागांवर घोडे अडले!
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गट व मनसेने एकत्र येण्याचे आणि एकत्र राहायचे ठरवले असले तरी चर्चेच्या अनेक फे-या होऊनही अजून जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. मराठीबहुल व मागच्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या १० प्रभागांसाठी दोन्ही सेना आग्रही असल्याने तिढा सुटत नसल्याचे समजते. हा तिढा सोडवण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांची तर खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, संजय राऊत यांनी दोन भावांची युती, मनोमिलन झालेले आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आदी मनपांची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही वाजतगाजत केली जाईल, असे सांगितले.

हिंदीसक्तीच्या विरोधातील मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी राजकारणातही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून युतीची चर्चा सुरू आहे. परंतु मनसेने उद्धव ठाकरे गटाचे प्राबल्य असलेल्या व मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या काही जागांवर हक्क सांगितल्याने निवडणूक जाहीर झाल्यानंतरही चर्चेच्या फे-या संपलेल्या नाहीत. आजही दिवसभर जोर बैठका सुरू होत्या. खा. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन भावांची युती, मनोमिलन झालेले आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही वाजतगाजत केली जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

जागावाटपासाठी ठाकरे बंधूंच्या नेत्यांची मातोश्री, शिवतीर्थावर सोमवारी दिवसभर धावपळ सुरू होती. अखेर ठाकरे बंधूचे ठरले असून, जवळपास सर्व जागांचा तिढा सुटला आहे. परंतु शिवडी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हा भाग मराठीबहुल आहे. परंतु या जागांवरून जास्त ताणू नका, अशा सूचना राज ठाकरेंनी संजय राऊतांसह स्वत:च्या पक्षातील नेत्यांना दिला होता. त्यामुळे यातील ब-याच जागांचा तिढा सुटल्याचे समजते. दरम्यान, भांडुप आणि विक्रोळीवरून रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.

महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे मतभेद असू नये आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आपण लढावे, असे आवाहन आम्ही काँग्रेसला केले आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्र लढायची आहे. मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहेत, असे सांगत आता त्यांची काही गणिते असतील. अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत यश मिळाले. पण मुंबईचे राजकारण वेगळे आहे. आम्ही वारंवार आवाहन करतो, की आपण एकत्र लढले पाहिजे. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर मतभेद बाजूला ठेऊन आपल्याला एकत्र येणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.

खा. संजय राऊतांचा
राहुल गांधींना फोन
मुंबई महापालिकेत भाजपला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी मविआ एकत्र राहावी, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात फोन वरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे. भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढूया अशी भूमिका संजय राऊत यांनी भूमिका राहुल गांधी यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे.

शरद पवार यांची
राष्ट्रवादीही सोबत
ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांची राष्ट्रवादीही येणार आहे. मात्र, त्यांना सन्मानजनक जागा हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईसाठी ठाकरे बंधूंना ५० जागांचा प्रस्ताव पाठवल्याचे समजते. यापैकी ३० जागांवर ठाकरे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला २५ जागा मिळू शकतात.

ठाकरे बंधूंचे शक्तिप्रदर्शन!
मुंबई महापालिकेत आपली मोट मजबूत असावी, यासाठी शेवटच्या क्षणी का होईना, पण ठाकरे बंधूंची धडपड वाढली आहे. यावर राऊत यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांवर पलटवार करताना हे नाटक नव्हे हा प्रीतिसंगम असल्याचे म्हटले. दरम्यान, युतीची घोषणा करण्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. आता हे शक्तिप्रदर्शन कोणत्या स्वरूपाचे असेल, याबद्दल उत्सुकता असणार आहे.

महायुतीत धुसफूस
मुंबई : महापालिका निवडणुकीत मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र निवडणुकांना सामोरे जाईल, असे चित्र आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चव्हाण ठाम आहेत. त्यावरून महायुती म्हणून भाजप-शिवसेना एकत्रित लढणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून मतभेद आहेत. त्यातच कल्याण-डोंबिवली, ठाण्यात अजूनही अंतर्गत धुसफूस कायम आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR