मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरे यांची, तर ठाणे मात्र एकनाथ शिंदेंचे यावर शिक्कामोर्तब केले. या सगळ्या गदारोळात काँग्रेस पक्षाने मात्र स्वत:ची अवस्था अत्यंत दारुण करून घेतली.
मुंबईत ३६ जागा आहेत. भाजपाने १९ जागी उमेदवार उभे केले, त्यातले १६ उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी २२ जागा लढविल्या, त्यातील ११ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आले. एकनाथ शिंदे यांनीही मुंबईत १४ जागी उमेदवार उभे केले. त्यातील ४ विजयी झाले. याउलट ठाण्यात घडले. ठाण्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. तेथे ठाकरे यांनी १० उमेदवार उभे केले होते. ते सर्वच्या सर्व पराभूत झाले. याउलट भाजपाने ठाण्यात १००% यश मिळवत उभे केलेले सर्व ९ उमेदवार विजयी केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ उमेदवार ठाण्यात उभे केले. त्यातील ६ विजयी झाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले.
या दोन्ही ठिकाणी मिळून मनसेने ४१ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. मात्र, मनसेने मिळविलेल्या मतांमुळे भाजपच्या यशाचा मार्ग सोपा झाला. पालघर, रायगड, मावळमधील १३ जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये ३, रायगडमध्ये १ आणि मावळमध्ये २ अशा ६ जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पालघर २, रायगड २ आणि मावळ १ अशा ६ जागा जिंकल्या.