अंबाजोगाई : प्रतिनिधी
कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणा-या पुरस्कारांचे वितरण सोमवार, दिनांक २६ मे रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे करण्यात आले. या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि पूर्वसंध्येला ‘खरीप पीक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम’ही आयोजित करण्यात आला होता.
कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थीप्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दिनांक २६ मे रोजी सकाळी वृक्ष पूजन व संवर्धन करण्यात येऊन नियोजित कार्यक्रमास सुरुवात झाली. उंदरी (ता. केज) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नागोराव पवार, डॉ. दिगंबरराव चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलनानंर स्मृती प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले की, ठोंबरे आणि आडसकर परिवाराचा जुना स्नेहबंध आहे. आई-वडिलांची सेवा करणारे, सेवाभाव जोपासणारे, माणुसकी जिवंत ठेवणारे आहे. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधीलकी जोपासून विविध क्षेत्रांत नि:स्वार्थपणे व समर्पित भावनेतून कार्य करणा-या आदर्श व्यक्तिमत्त्वांना ठोंबरे कुटुंबिय दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करते हे अभिनंदनीय कार्य आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारा आहे. तर अध्यक्षीय समारोप करताना आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, हे प्रतिष्ठान चांगले उपक्रम राबवून कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे यांचे समर्पित कार्य व संस्काररूपी विचार पुढे नेत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर मोरे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन करून उपस्थितांचे आभार सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी मानले.