मुंबई : फरहान अख्तरने ‘डॉन ३’ साठी अभिनेता रणवीर सिंगला कास्ट केले आहे. यापूर्वी डॉनच्या रूपात आपण अभिनेता अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांना पाहिले होते. आत रणवीर डॉन बनण्यासाठी सज्ज झाला आहे. अमिताभ आणि शाहरूख या दोघांनीही डॉनच्या भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवली होती. सूत्रांच्या मते, चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शन आणि चित्रपटाच्या लोकेशनबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. यासोबतच चित्रपटाची शूटिंग कधी सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
चित्रपट उद्योगातील एका सूत्राने खुलासा केला आहे की ‘डॉन ३’ सध्या कास्टिंगच्या टप्प्यात आहे. ‘डॉन ३’ चे प्री-प्रॉडक्शन पुढील महिन्यात सुरू होणार आहे, तर शूटिंग या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. ‘डॉन’च्या पहिल्या दोन चित्रपटांमधील अनपेक्षित ट्विस्ट्सप्रमाणेच या चित्रपटातही प्रेक्षकांसाठी काही सरप्राईज असतील आणि अनेक मनोरंजक लोकेशनवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. अशी चर्चा आहे. यासोबतच ‘डॉन ३’ मधील मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबतची माहितीही गुप्त ठेवली जात आहे. मात्र, शूटिंग सुरू होण्यापूर्वी मुख्य अभिनेत्रीबद्दल अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रणवीर सिंगसोबत खलनायकाच्या भूमिकेसाठी इम्रान हाश्मीसोबत चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सध्या इम्रान हाश्मी नकारात्मक भूमिका साकारण्यावर जोर देत आहे. इम्रानचे चाहते त्याला नकारात्मक भूमिकेतही खूप पसंत करत आहेत. याआधी सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत त्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.