38.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रतनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख

तनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनीषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला होता. प्रसूतीदरम्यान तनीषाने जन्म दिलेल्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना वाकड येथील सूर्या मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर सेंटरमधील एनआयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवले आहे.

त्या उपचारांसाठी तनीषाचे पती सुशांत भिसे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेत दोन्ही मुलींच्या उपचारासाठी २४ लाख रुपयांचा निधी सूर्या मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर सेंटरकडे वर्ग करण्यात आला आहे.

पहिल्या मुलीच्या उपचारासाठी १० लाख, तर दुस-या मुलीच्या उपचारासाठी १४ लाख असे एकूण २४ लाख रुपये सूर्या मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर सेंटरच्या खात्यात जमा झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुखांकडून सूर्या रुग्णालयास पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. शासन अधिनियमातील अटींच्या अधीन राहून रुग्णालयाने अर्थसाहाय्य खर्चाची रक्कम ९० दिवसांत उपयोगात आणावी अन्यथा शिल्लक राहिल्यास मुख्यमंत्री साहाय्यता कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करावी, असे आदेश दिले आहेत.

गर्भवती तनीषा भिसे मृत्यूप्रकरणी झालेल्या चौकशीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी कारभारावर ठपका ठेवत शासनाने रुग्णालय प्रशासनाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे; तर डॉ. सुश्रुत घैसास यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी भिसे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भिसे कुटुंबीयांना योग्य न्याय व दोन चिमुकल्या जिवांचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून करण्याचे आश्वासन दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR