रेणापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या यादीत रेणापूर तालुक्याचा समावेश केला व तसा अध्यादेश काढला परंतु दुष्काळाच्या अनुषांगाने मिळणा-या सवलती व उपाययोजना करण्यात आल्या नाहीत म्हणून पीकविमा कंपनी , महावितरण कंपनी, प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यालयातील सावळा गोंधळ थांबविण्यासाठी शेतकरी क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिल कार्यालयासमोर सोमवारी दि. २९ जानेवरी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले . मागण्याचे निवेदन तहसिलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यांना देण्यात आले .
जिल्ह्यात रेणापूर तालुक्यात कमी पाव पाऊस झाल्याने त्यातच मोठा खंड पडल्याने तालुक्यात दुष्काळी परस्थितिी निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि. १ सप्टेबर २०२३ रोजी अग्रिम पीकविमा वाटप करण्याची अधिसूचना काढण्यात आली परंतु आजपर्यंत कारेपूर महसूल मंडळ वगळता अन्य चार महसूल मंडळात अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामातील पिके हातची गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता.
शासनाने जिल्ह्याात एकमेव रेणापूर तालुक्याचा दुष्काळ ग्रस्त म्हणून समावेश केला मात्र दुष्काळी तालुक्याच्या सवलती व उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आल्या नाहीत परिणामी शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला गेला आहे. याबाबत येथील तहसिल कार्यालया समोर शेतकरी क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांने जागरण गोंधळ आंदोलन केले. यावेळी तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड , तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी आंदोलन स्थळी येऊन मागण्याचे निवेदन स्वीकारले.