नांदेड : जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली असून यामुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
रविवारी जिल्हयातील ९३ मंडळापैकी ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान महसूल यंत्रणा कामी लागली असून जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची नेमकी अंदाजित आकडेवारी आज पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातला नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर २५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांत ३ जण वाहून गेल्याची माहिती आहे.