17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरतिरुका येथील नागरिकांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात 

तिरुका येथील नागरिकांचे धुळीमुळे आरोग्य धोक्यात 

जळकोट :  प्रतिनिधी
जळकोट ते उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील तिरुका गाव वगळता संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे परंतु तिरुका गावाजवळच रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे . प्रचंड खड्डे , मोठ मोठाले दगड, अरुंद रस्ता यामुळे वाहनधारकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रचंड धुळीचे लोट उडत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या ठिकाणचा वाद मिटेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने डोंगरगाव पाटी ते तिरुका गावापर्यंत डांबरीकरण रस्ता करावा अशी मागणी  जळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ रस्त्याचे काम अपूर्ण आहे.या रस्त्यामध्ये ज्या शेतक-यांची जमीन गेली आहेकिंवा प्लॉटचा काही भाग गेलेला आहे अशा शेतक-यांंनी न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे गत चार वर्षापासून या ठिकाणच्या रस्त्याचे काम अपूर्णच आहे.
या ठिकाणी सिमेंटचा रस्ता होणार असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने डोंगरगाव पाटी तिरुका गावाजवळील उड्डाणपुलापर्यंत रस्ता उखडून टाकला होता. डोंगरगाव पाटी ते तिरुका जो जुना रस्ता होता त्याच्या बाजूनेच नवीन रस्ता होणार होता. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे परंतु मागच्या बाजूला आणि समोरील बाजूला रस्ता करण्यास कृत्रीम अडचण येत असल्यामुळे या रस्त्याचे काम रखडलेले आहे. तिरुका गावाजवळ झालेला उड्डाणपूल अरुंद आहे यामुळे या ठिकाणाहून केवळ एकच वाहन जाते दुसरे वाहन आल्यास मोठी अडचण होत आहे.
या ठिकाणी मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. यासोबतच जळकोटकडून येताना , प्रचंड चढ या उड्डाणपुलाजवळ आहे , यामुळे अवजड वाहन या ठिकाणी जाताना जीव मुठीत धरून चालकाला वाहन चालवावे लागत आहे. या उड्डाण पुलावर तीन-चार अपघातही झाले आहेत. या गावाजवळ रस्ता खराब झाला आहे. मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात तर अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. कार तसेच दुचाकीवरून प्रवास करणे अवघड जात आहे. तसेच प्रचंड धुळीमुळे तिरुका वाशीयही त्रस्त झाले आहे. यामुळे जेव्हा वाद मिटेल तेव्हा मिटेल तोपर्यंत पूर्वी जसा रस्ता होता तसा करून द्यावा, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण करून द्यावे अशी मागणी प्रवासी व वाहनधारक करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR