मुंबई : वृत्तसंस्था
सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रिया मराठेसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री प्रिया मराठेचे रविवारी ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील सहकलाकार आणि जिवलग मैत्रीण प्रिया मराठेच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट न लिहिल्याने अभिनेत्री अंकिता लोखंडेला नेटक-यांनी प्रचंड ट्रोल केले होते. अंकिताने प्रियासोबतचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात प्रिया अंकिताच्या घरी गौरी महाआरतीला आवर्जून उपस्थित असायची. परंतु यावर्षी ती नाही, या भावनेने अंकिताचे मन भरून आले आहे. आज ती आमच्यासोबत नाहीये, हे लिहितानाही प्रचंड दु:ख होत असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.
‘पवित्र रिश्ता या मालिकेदरम्यान झालेली प्रिया माझी पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया.. आमची छोटी गँग.. जेव्हा कधी आम्ही तिघी एकत्र असायचो, तेव्हा नेहमीच मनात समाधानाची भावना असायची. प्रिया, प्रार्थना आणि मी एकमेकींना ‘वेडे’ असं म्हणायचो आणि आमचे नाते खरंच खूप खास होते. माझ्या चांगल्या दिवसांत ती सोबत होती आणि दु:खाच्या क्षणांत तिने मला सावरले. मला जेव्हा कधी तिची गरज होती, तेव्हा ती मदतीला धावून यायची.
गणेशोत्सव काळातील गौरी महाआरतीला ती कधीच गैरहजर राहिली नव्हती आणि यावर्षी.. मी तुझ्या आत्म्यासाठी प्रार्थना करते वेडे.. तुझी खूप आठवण येईल’, असे तिने लिहिले आहे. प्रिया मराठे, अंकिता लोखंडे आणि प्रार्थना बेहेरे या तिघींनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या तिघींनी ऑनस्क्रीन बहिणींची भूमिका साकारली होती.