28.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयतुझे नी माझे व्हावे मिलन..!

तुझे नी माझे व्हावे मिलन..!

‘गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नी माझे व्हावे मिलन’ असे एक गीत आहे. फुलांचा गंध संपण्याची वेळ आली, फुले कोमेजून जाऊ लागली; परंतु मिलन काही होत नाही. महाराष्ट्रातील दोन नेत्यांची, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची अशीच प्रतिकात्मक स्थिती झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का? असा सवाल गत अनेक वर्षापासून सतत विचारला जात आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव द ट्रूथ’ या यूट्युब चॅनेलसाठी राज ठाकरे यांची मुलाखत घेताना पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला आणि शिळ्या कढीला ऊत आला. राज ठाकरे यांनी राजकारणाला शोभेल असे उत्तर देताना म्हटले की, आमच्यातील वाद, भांडणे छोटी आहेत. त्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे त्यामुळे एकत्र येणे कठीण नाही; पण विषय इच्छाशक्तीचा आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमच्यातील किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला तयार आहे मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी युती करायची की भाजपसोबत जायचे, हे स्पष्ट करायला हवे.

चोरांना पाठिंबा नाही ही शिवरायांची शपथ घ्या. राज आणि उद्धव कधीही एकत्र येणार नाहीत, असे काही जणांचे मत आहे तरीही सतत हा विषय काढून त्यावर वक्तव्य करत प्रसिद्धी मिळवण्याची काही जणांना हौस आहे, असो. महेश मांजरेकरांच्या यूट्युब चॅनेलसाठी मुलाखत घेताना मांजरेकरांनी उद्धव ठाकरे आणि तुमची युती होऊ शकते का? असा प्रश्न विचारला. त्यावर राज म्हणाले, आमच्यातले वाद किरकोळ आहेत आणि महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सा-या गोष्टी क्षुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणे गरजेचे आहे. एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे, असे मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझा विचार होता की, आपण बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करायचे नाही; परंतु मी शिवसेनेत होतो तेव्हा माझी उद्धव सोबत काम करण्यास काहीच हरकत नव्हती. आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो कधी आणत नाही, आणलाही नाही.

उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर लगेच आपली भूमिका स्पष्ट केली. दादरच्या शिवाजी महाराज स्मृती मंदिरात कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मीसुद्धा तयार आहे. मी मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन करतो; पण माझी एक अट आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे लोक महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात होते तेव्हाच तुम्ही विरोध केला असता तर आज हे सरकार दिल्लीत बसले नसते. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे सरकार केंद्रात बसवले असते. महाराष्ट्रातसुद्धा आपल्या महाराष्ट्राचा विचार करणारे सरकार बसले असते. त्याच वेळी हे काळे कामगार कायदे कच-याच्या पेटीत फेकून दिले असते; पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे असे चालणार नाही.

महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही, हे पहिल्यांदा ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यात माझ्याकडून कोणतीही भांडणे नव्हतीच. जी होती ती आजच मी मिटवून टाकली. कुणासोबत गेल्यानंतर महाराष्ट्राचे, मराठी व हिंदुत्वाचे हित होणार हे ठरवा मग पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा हे ठरवा. महाराष्ट्राचे हित ही माझी एकच अट आहे. मराठीच्या मुद्यावर एकमत असलेले; पण एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू कधी एकत्र येणार? अशी उत्सुकता राज्यातील तमाम शिव आणि मनसैनिकांना लागून राहिली आहे. अनेकदा टाळी देण्याचे प्रयत्न झाले; पण हे बंधू एकत्र येण्याची चिन्हे दिसत नव्हती; पण सध्या स्वत:च्याच अस्तित्वासाठी लढणा-या उद्धव आणि राज ठाकरे यांनी आता मात्र एकमेकांना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता असून ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता दुणावली आहे.

राजकारणात काहीही होऊ शकते त्यामुळे राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हटले जाते. त्यानुसार गत दोन दशकांहून अधिक काळ वेगवेगळी चूल मांडणारे राज आणि उद्धव ठाकरे यांची आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी युती होऊ शकते, असे संकेत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यामध्ये कोणीही वाईट वाटण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. ऑफर देणारे आणि त्याला प्रतिसाद देणारे यांच्या बाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. मनसे आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही पक्षांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं की नाही या बाबत दुस-या कोण्या राजकीय पक्षाने सांगण्याचे काही कारण नाही. प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटते, तो निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उद्धव आणि राज या दोन्ही भावांनी एकत्र यावं ही लोकभावना आहे. एकत्र आल्यास त्याचा महापालिकेत चांगला परिणाम होऊ शकतो, असे जनमत आहे. सध्या मुंबईत इतर भाषिकांची सुरू असलेली दादागिरी, वाद यामुळे मराठी माणूस नाराजच नाही तर संतापलेला आहे. त्यांना एका चांगल्या पर्यायाची प्रतीक्षा आहे म्हणून गंध, फुले ओरडून सांगताहेत… तुमचे व्हावे मिलन!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR