लातूर : प्रतिनिधी
पोलीस बंधू आणि भगिनी २४ तास सेवेत तत्पर असल्याने प्रत्येक नागरिक आपल्या घरी कुटुंबियांसोबत अगदी सुरक्षितपणे सण साजरे करू शकतात. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने थँक्यू पोलीस हा उपक्रम राबवून लातूरच्या दामिनी पथकातील पोलीस बंधू आणि भगिनी यांच्यासोबत शुक्रवारी दिवाळी साजरी केली. यावेळी पोलिसांना दिवाळीच्या निमित्त मिठाई देण्यात आली.
पोलीस बांधव आणि भगिनी २४ तास जनतेच्या सेवेत तत्पर असतात. कुठल्याही सणाला त्यांना सुट्टी भेटत नाही. सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे पोलीस कार्यरत असतात. पोलीस आहेत म्हणून नागरिक आपल्या घरी आनंदात आणि सुरक्षितपणे सण साजरे करू शकतात. वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे गेल्या नऊ वर्षांपासून थँक्यू पोलीस हा उपक्रम राबवून पोलिसांच्या प्रती नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली जाते. या उपक्रमात सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांच्यासह दामिनी पथकातील पोलीस बंधू भगिनी सहभागी झाले होते.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, कार्यकारिणी अध्यक्ष अॅड. डॉ. अजित चिखलीकर, वृक्ष लागवड अभियान प्रमुख राहुल माशाळकर, सदस्य वैभव वाघ, संजय माकुडे, अर्जुन सूर्यवंशी, दत्ता जाधव, आदींनी पुढाकार घेतला.