बीड : प्रतिनिधी
सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसेच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस बाहुबली असल्याची घोषणाबाजी या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. तोच धागा पकडत पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांना बाहुबली म्हणत स्वत:ला शिवगामी असल्याचे सांगून टाकले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना धारेवर धरले आहे.
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, देवेंद्रजी मला एक किस्सा आठवला. मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात. तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात. आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो. आज ममत्वभाव येत आहे. ते तुम्हाला बाहुबली म्हणत होते काही वर्षांपूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. शिवगामिनी बाहुबलीची आई आहे. त्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला.
शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन जे जाहीर वचन सुरेश धस यांना मी दिले तेच माझे शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरेश धस यांनी गेल्या महिनाभरात घेतलेल्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे या कार्यक्रमाला येणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. पण पंकजा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत सर्व उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम दिला.