चाकूर: अ. ना. शिंदे
कृषी विभागाच्या अहवालांनुसार तालुक्यात जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत खरीप हंगामात एकूण ६० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. प्रामुख्याने त्यात सर्वसाधारण खरीप हंगामातील तूर क्षेत्र ९५५४.८० हेक्टर असून त्यापैकी ५०५८ हेक्टर क्षेत्रात तुर पेरणी झाली असून ५२.९४ टक्के क्षेत्र आहे.
तालुक्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे कोवळी पिके करपली होती. ज्या शेतक-यांकडे पाण्याची सोय आहे, तिथे पीकं टिकून आहे, मात्र कोरडवाहू क्षेत्रातील तुरीला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात तूर उत्पादनात सुमारे २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. काही अतिशय कोरडवाहू किंवा दुष्काळबाधित क्षेत्रांमध्ये हे पिकाचे नुकसान यापेक्षाही जास्त असू शकते. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळानंतर पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ दडीमुळे तुरीच्या रोपांची वाढ खुंटली आणि अनेक ठिकाणी पिके करपली. ज्या शेतक-यांकडे विहीर किंवा बोअरवेलद्वारे संरक्षित पाण्याची सोय नाही, अशा कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सामान्यत: तुरीचे सरासरी एकरी उत्पादन ४ ते ६ क्विंटलच्या आसपास होत असते परंतु, यंदा पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यामुळे ही सरासरी एकरी १ ते २ क्विंटलपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. तालुक्यातील बहुतांश तूर लागवड ही कोरडवाहू आहे. यंदा मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी झाल्याने विहिरी आणि बोअरवेल ऑक्टोबर महिन्यातच कोरड्या पडू लागल्या आहेत.
















