29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeलातूरतू कर मारल्यावानी, मी करतो रडल्यावानी

तू कर मारल्यावानी, मी करतो रडल्यावानी

लातूर : प्रतिनिधी
गौण खनिज मुरूमाची अवैध वाहतूक करणारा व महसूलच्या ताब्यातून लंपास झालेल्या हायवाची तक्रार  एमआयडीसी पोलिस ठाण्यात देऊन व याला आठवडा होऊनही त्या हायवाचा शोध अद्याप ही लागला नाही. हायवाचा नंबर, हायवाच्या मालकाचे नाव व संपर्क नंबर समोर आले असतानाही तो सापडत नाही हे मात्र विशेष असून सध्या या प्रकरणी पोलिस व महसूल प्रशासनाचे तू कर मारल्यावानी, मी करतो रडल्यावानी, असा काहीसा प्रकार सुरू आहे. हे पाहता पोलिस व महसूल प्रशासन दरबारी सर्व सामान्यांचे काय होत असेल, याचा विचार न केलेलाच बरा, अशी काहीशी परस्थिती आहे.
शनिवार, दि. ३ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे हे लातूर विमानतळावरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्या वेळी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला एक हायवा एमएच २४ जे ९७४८ आडवा गेला. सदर वाहनाची चौकशी करण्याच्या सूचना तांदळे यांनी सोबतच्या अधिका-यांना दिल्या. त्या वेळी त्या हायवात अवैध प्रकारे भरलेला जवळपास ५ ब्रास मुरूम होता. त्याची रॉयल्टीही भरलेली नव्हती. यामुळे सदर वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना तहसीलदार तांदळे यांनी चालकाला दिल्या. हे ऐकताच सदर हायवा चालकाने वाहन तेथेच सोडून धूम ठोकली. त्या नंतर हायवाला तहसीलच्या पथकाने सील केले.
दरम्यान, त्याच दिवशी शनिवारी दुपारच्या सुमारास तहसीलचे पथक हायवा ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात लावण्यास गेले असता लावलेल्या ठिकाणी हायवा आढळून आला नाही. यामुळे मंडळ अधिकारी रामराव झाडे यांनी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या वरून अज्ञाता विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात हायवा चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत; परंतु आठवडा उलटूनही तो अजूनही एमआयडीसी पोलिसांना सापडला नाही.  या प्रकरणी जिल्हाभरात विविध शंका-कुशंका नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत. या संदर्भात महसूल व पोलिस प्रशासनाकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR