32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeसोलापूररेल्वेतून प्रवास करताना चार लाखांचा ऐवज लंपास

रेल्वेतून प्रवास करताना चार लाखांचा ऐवज लंपास

कुर्डुवाडी – एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रेल्वेमधील प्रवाश्यांची चोरी झाली असून या दोन्ही चोऱ्यांमध्ये ३ लाख ८१ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. या घटना सोलापूर ते कुर्डुवाडी स्थानकादरम्यान घडल्या. पहिल्या घटनेतील फिर्यादी महिला शामला हवालदार (रा. बंगळुरु) या साईनगर शिर्डी या गाडीतून बंगळुरु ते शिर्डी असा प्रवास करत असताना सदर गाडी पहाटे ४.३५ ते ४.४० वा. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबली असता, फिर्यादीला जाग आली. त्यांच्या गोल्डन रंगाच्या पर्समधील ५० ग्रॅमचे २ लाख ५० हजारांचे मंगळसूत्र, ४० हजारांचा आय फोन, १५ हजारांचा मोबाइल व ६ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ११ हजारांचा ऐवज चोरट्यांनी पर्ससह लंपास केला.

त्यावेळी शोध घेत असताना काळा टी-शर्ट व डोक्यावर टोपी असलेला ३० वर्षीय एक इसम पळून जाताना फिर्यादीला दिसला. सदर पर्स या इसमाने चोरून नेल्याचा फिर्यादीचा संशय असून सदर अज्ञात इसमावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत फिर्यादी अंजुनेइलु सय्यदलू अक्केम (सध्या रा. खराडी पुणे, मुळ रा. गुंटुर, आंध्रप्रदेश) हे पुणे येथे जाण्यासाठी हुसेनसागर एक्स्प्रेसने हैदराबाद ते पुणे असा जनरल बोगीतून प्रवास करत असताना सदर गाडी पाचच्या सुमारास सोलापूर येथे आली असता त्यावेळी फिर्यादीची लॅपटॉप बॅग त्याच्याजवळ होती. प्रवासा दरम्यान झोप लागली असताना गाडी केम रेल्वे स्थानकावर थांबली असता फिर्यादी जागे झाले.

त्यावेळी ७० हजार ५०० रुपयांचा लॅपटॉप व बॅग त्याच्याजवळ नव्हती. सदर लॅपटॉपची बॅग अज्ञात चोरट्याने केम रेल्वेस्थानक येण्यापूर्वी चोरून नेल्याची फिर्याद दिल्याने कुडूवाडी लोहमार्ग पोलिसांत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR