अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुलासारख्या तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापि, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वर्तमान स्थिती काय आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. मुळात, आर्थिक विकास या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रामुख्याने सरकारच्या डोळ्यांसमोर औद्योगिक विकासच असतो. शेतीचा विकासही आर्थिक विकासात समाविष्ट आहे, याचे सातत्याने विस्मरण होताना दिसते. शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे जमिनीचे विभाजन मोठ्या प्रमाणावर झाले आणि शेती परवडण्याजोगी राहिली नाहीये. त्यामुळे औद्योगिक विकासास चालना देऊन शेतीवरील लोकसंख्येचा भार हलका करणे योग्यही आहे.
तथापि, आजच्या आधुनिककरणाच्या जमान्यात स्वयंचलित यंत्रांची संख्या वाढत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रोजगारनिर्मितीचा दर खूपच घसरला आहे. विकास होताना दिसतो; परंतु मोठ्या संख्येने लोक या विकासप्रक्रियेबाहेर फेकली जातात, असे व्यस्त चित्र दिसून येते. शेतीतसुद्धा पिकांच्या बाबतीत समतोल आढळून येत नाही. सिंचनाचा लाभ केवळ नगदी पिकांसाठी घेतला गेल्याने हा असमतोल निर्माण झाला आहे. या असमतोलाचा एक गंभीर परिणाम म्हणजे, तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत कधीकाळी स्वयंपूर्ण असणारा आपला देश आता मोठ्या प्रमाणावर आयातदार बनला असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर परकय चलन खर्ची पडत आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी भारतासारख्या देशाने परकीय बाजारपेठेकडे नजर ठेवून उत्पादनप्रक्रिया राबवू नये, असा सल्ला दिला होता. भारत सध्या खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. एकूण गरजेच्या तब्बल ६० टक्के खाद्यतेल देशाला आयात करावे लागते. त्यासाठी विदेश चलनही खर्च करावे लागते. चालू आर्थिक वर्षात खाद्यतेल आयातीवर १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च झाला असावा, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, तेलबियांच्या उत्पादनास प्रोत्साहन दिल्यास परकीय चलनाची बचत होऊ शकेल. त्याचबरोबर शेतक-यांना योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल. तथापि, शासनाची धोरणे पाहिल्यास ती तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहनपर दिसून येत नाहीत.
भारतातील महत्त्वाच्या तेलबियांमध्ये सोयाबीन, तीळ, मोहरी, शेंगदाणे, करडई, सूर्यफूल, सरकी, एरंड यांचा समावेश असून यापासून बनवलेले तेल खाद्यासाठी वापरले जाते. त्यामध्ये सोयाबीनपासून बनवलेले तेल सर्वांत जास्त प्रमाणात खाद्यासाठी वापरले जाते. यंदा देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन कमी असल्यामुळे सोयापेंडीची आयात सरकारकडून करण्यात आली आहे; मात्र देशातील सायाबीन उत्पादक शेतक-यांच्या मालाला नाममात्र दर मिळताना दिसत आहे. सोयापेंड, सरकीपासून बनविलेल्या उत्पादनांची आयात केल्यामुळे अनेकदा देशांतर्गत सोयाबीनचे दर पडतात. अशा स्थितीत शेतक-यांचे मोठे नुकसान होते. परिणामी, पुढील वर्षी लागवड करताना शेतकरी अन्य पिकांचा विचार करू लागतो.
जागतिक स्तरावर भारताचा तेलबिया लागवडीत १४-१५ टक्के वाटा आहे. मात्र, खाद्य तेल उत्पादनात केवळ ६-७ टक्के इतकाच वाटा आहे. महाराष्ट्रात तेलबियांचे उत्पादन करण्यात जळगाव जिल्हा पूर्वीपासून आघाडीवर आहे. मात्र,या जिल्ह्यातील तेलबियांचे क्षेत्र नाममात्र उरले आहे. भुईमुगाची लागवड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत होती. आता भुईमुगाची लागवड फार थोड्या प्रमाणात होते. जळगावसह संपूर्ण राज्यातच भुईमूग, तीळ, जवस, कारळा, सूर्यफूल ही पिके कमी होत आहेत. तेलबियांच्या बाबतीत आपण पूर्वी स्वयंपूर्ण होतो. परंतु आता तेलबियांची पिके जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भुईमूग हे तेलबियांपैकी प्रमुख पीक असून, खरीप आणि रब्बीबरोबरच उन्हाळी हंगामातही भुईमुगाची लागवड होऊ शकते. तीनही ऋतूत येणारे हे पीक आता अत्यल्प प्रमाणात घेतले जाते. तेलबियांच्या पिकांचा दुहेरी फायदा होतो. एकतर तेलबियांची पिके मध्यम कालावधीची, जिरायती जमिनीत येणारी आणि आंतरपीक पद्धतीस पोषक ठरत असल्यामुळे शेतक-यांना फायदा होऊ शकतो. तेलबियांमध्ये सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल यांबरोबरीने करडईचा विचार प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. करडई उत्पन्नात एके काळी जगात भारत पहिल्या क्रमांकावर होता. जगातील ५० टक्के करडईचे उत्पादन भारतात होत असे व भारतात सर्वाधिक करडईचा पेरा करणारा प्रांत म्हणून महाराष्ट्राची ओळख होती.
ग्रामीण भागात आजही करडईच्या तेलाला मागणी आहे. करडईचे तेल आरोग्यासाठी अत्यंत पोषक मानले जाते. करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जातात. ती तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतात. अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. परिणामी झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणातही चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. परंतु या तेलाचे विपणन आणि जाहिरात करण्याबाबत आजही आपण कमी पडलो. तसेच करडई लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य धोरणे शासनाकडून राबवली गेली नाहीत. करडईप्रमाणेच जवस, तीळ यांसारख्या तेलांचेही आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. परंतु त्यांचा तेलासाठी वापर करण्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे, सरकार तेलबियांसाठी हमीभाव वाढवून दिल्याची घोषणा करते; परंतु नैसर्गिक संकटाच्या काळात या पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत नाही. त्यामुळे शेतकरी तोट्यात जातो.
तेलबियांबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी या पिकांना हमीभाव वाढवून देण्याबरोबरच प्राधान्याने या पिकांवर प्रक्रिया करणा-या तेलघाण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पूर्वी गावपातळीवर तेलाचे घाणे असत आणि तेथे तेलबिया गाळून तेल काढण्यात येत असे. शेतक-यांना घरचे तेल वर्षभर वापरायला मिळत होते आणि उर्वरित तेलाची ते विक्रीही करू शकत होते. देशी घाण्यातून काढलेले तेल आरोग्यवर्धक असते. परंतु आता असे घाणे जवळजवळ नामशेष झाले आहेत. या घाण्यांमधून निघणारी पेंड हा दुभत्या जनावरांसाठी पोषक चारा म्हणून वापरला जात असे, तेही जवळजवळ बंद झाले. या घाण्यांसाठी शेतक-यांच्या तरुण पिढीला, ग्रामीण तरुणांना भांडवल उपलब्ध करुन दिले पाहिजे. त्यातून रोजगारनिर्मितीही होईल आणि तेलबियांचा पेरा वाढण्याकडेही शेतकरी वळतील. शेतीसमस्येबाबत नेहमीच कृषीतज्ज्ञ ही बाब सांगत आले आहेत की, शेतात तयार होणा-या पीकांवर प्रक्रिया करणारे उद्योग त्या-त्या भागात उभे राहिल्यास कृषीअर्थकारण सुधारते. दुसरी गोष्ट म्हणजे पाम तेलाचे मिश्रण. आज देशात आयात होणारे बहुतांश तेल खाद्यतेल म्हणजे पामतेल होय. ते आरोग्यासाठी घातक असून, इतर आयात तेलेही शुद्ध असण्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळेच तेलबियांच्या उत्पादनासाठीही शेतक-यांना प्रोत्साहन देणे गरजेचे बनले आहे.
आयात तेलावरील अवलंबित्व कमी झाल्यास परकीय चलन तर वाचेलच; शिवाय शुद्ध स्वरूपातील तेल मोठ्या प्रमाणावर देशातच निर्मित होऊ लागल्यास त्याचा लोकांच्या आरोग्यावरही अनुकूल परिणाम दिसेल. शेतकरी कुटुंबांबरोबरच ग्राहकांनाही शुद्ध स्वरूपाचे तेल मिळू लागेल. आज ब्रँडेड तेलांचा बराच बोलबाला आहे. परंतु त्यामध्ये पाम तेलाचे प्रमाण किती असते, हे सांगितले जात नाही. बाजारात सध्या तीळाचे तेल, शेंगदाणा तेल ज्या दरांमध्ये मिळते त्याची शेंगदाणे आणि तिळाच्या दरांशी तुलना करुन पाहिल्यास सहजगत्या ग्राहकांच्या वस्तुस्थिती लक्षात येईल. पण ग्राहकही आता या मिश्रीत तेलाला सरावले आहेत. देशी घाण्याच्या तेलाची शुद्धता आपण विसरून गेलो आहोत. त्याचाही परिणाम तेलबियांच्या उत्पादनात घट होण्यावर झाला आहे. तेव्हा तेलबियांबाबत स्वयंपूर्ण होण्याचा विचार स्वागतार्ह असला तरी त्यासाठी जमिनीस्तरावरील वास्तव विचारात घ्यावे लागेल. ऊसासारख्या नगदी पिकांकडे शेतकरी वळण्याचे कारण म्हणजे त्यातील उत्पन्नाची शाश्वती.
-नवनाथ वारे, कृषि अभ्यासक