पुणे : प्रतिनिधी
राज्यात आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीची चांगलीच लाट उसळली आहे. आबाल-वृद्धांपासून सगळ्यांनाच हुडहुडी भरली आहे. गरम कपडे, शेकोट्या पेटवून गर्मीची ऊब घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही थंडी काही सहन होत नसल्याने सायंकाळी सातच्या आत दारे-खिडक्या बंद करून झोपी जाणे नागरिकांनी पसंत केले आहे. थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अद्यापपर्यंत हिवाळ्यात पाहिजे तशी थंडी जाणवली नाही. त्यामुळे ब-याच लोकांनी गरम कपडे अर्थात मफलर, स्वेटर, हातमोजे, कानपट्ट्या, चादरी, रजई, वाकळ, गोधडी अजूनही बाहेर काढले नव्हते. पाहिजे तेवढ्या शेकोट्या पेटवून शेतकरी, शेतमजूर, नागरिक बसलेले दिसत नव्हते. मात्र, या दोन-चार दिवसांपासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात थंडीची लाट उसळली असून सगळ्यांनाच हुडहुडी भरली आहे.
सकाळी १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजल्यापासून थंडी सुरू होत आहे. तसा दिवसभरच गारठा, थंडी चालूच आहे. पण रात्री पडणारी थंडी तीव्र आणि बोचरी आहे. त्यामुळे सगळीकडे शेकोट्या पेटवून गरम शेकत बसलेले लोक दिसत आहेत. कडाक्याच्या थंडीने कुडकुडत बसून गारठून जाण्याची वेळ आल्याने आबाल-वृद्धांपासून सगळेच हैराण झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकरी थंडीच्या लाटेमुळे उत्साहित
थंडीची लाट कधी कमी होईल, याची सगळेच वाट पाहत असले तरी शेतकरी मात्र थंडीच्या लाटेमुळे उल्हसित झाला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला या पिकांना जेवढी थंडी जास्त पडेल तेवढी रब्बी पिके जोमाने वाढतात. फुटवे करतात, पिकांची प्रत दर्जेदार होते.